Headlines

विद्युत पुरवठ्याचा बोजवारा; तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन:मनसेचा महावितरण कंपनीला इशारा; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन‎




जिल्ह्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. याबाबत मनसेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. गत तीन वर्षांपासून अकोला, विशेषत: जुने शहरासह अन्य भागांत, ग्रामीण भागातही विजेचा खेळखंडोबा असतो. क्षणाक्षणाला वीजपुरवठा बंद होणे. तासनतास अकोला अंधारात बुडणे. हे आता नेहमीचे झाले आहे. सातत्याने तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना अकोलेकरांना सुरळीत आणि पूर्णवेळ वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यश आलेले नाही. नियमित विद्युत देयक भरणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींना महावितरण कंपनीचे काही अभियंते वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचा अनुभव जुने शहरातील अनेकांना नेहमीच येतो. केवळ विद्युत देयक भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या महावितरण कंपनीने सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत असतानाच आता मनसेनेही हा मुद्दा लावून धरला आहे. सध्या अकोला शहर व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला असतानादेखील वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. वारंवार होणारे वीज फ्लक्च्युएशन. अचानक खंडित होणारा वीजपुरवठा. विशेषतः रात्रीच्या वेळी होणारे त्रास. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या भीषण उष्णतेमध्ये सामान्य नागरिक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, असे मनसेचे म्हणणे आहे. याबाबत मनसेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि शहराध्यक्ष सौरभ भगत आदी उपस्थित होते. मागण्या पूर्ण न झाल्यास महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मनसेच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. शहर व जिल्ह्यातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. वारंवार होणारे फ्लक्च्युएशन रोखण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना कराव्यात. ओव्हरलोडिंग होत असलेल्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत. देखभाल व दुरुस्तीची कामे नियमित आणि काटेकोरपणे करण्यात यावीत. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. मुख्य अभियंत्यांनी घेतला होता आढावा : महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी बैठकीत दिले होते. विद्युत भवन येथे पार पडलेल्या पायाभूत आराखडा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी फिडरनिहाय कामाचा आढावा घेतला. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत मुख्य अभियंत्यांनी कंत्राटदारांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या. दर आठवड्याला प्रगती आढावा बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले होते. आता मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासन किती गतिमान होते, हे आगामी काळात दिसून येणार आहे. नियमित देखभाल महावितरणकडून प्रभावीपणे नियमित देखभाल (मेंटेनन्स) होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. अपुरी कर्मचारी संख्या तसेच ट्रान्सफॉर्मरवर वाढलेला लोड (ओव्हरलोडिंग) ही या समस्येची मुख्य कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखे आहे, अशी टिका मनसेने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *