![]()
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उमेदवारीबाबत रणनीती आखली जात असून, पहिला उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील विश्वासू आणि अनुभवी चेहरा म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे पहिल्या जागेवर शिंदे गटाकडून स्थैर्य राखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र, दुसऱ्या जागेवरून चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. दुसऱ्या जागेसाठी पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांसारखी अनेक नावे चर्चेत आहेत. या सर्वांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली असून, शिंदे कोणावर विश्वास दाखवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयोग केल्यानंतर, विधानपरिषदेतही अशाच प्रकारचा धक्कातंत्र वापरला जाईल का, याची चर्चा सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेना शिंदे गटाकडे विधानसभेत 57 आमदारांचे संख्याबळ असल्याने दोन जागा जिंकण्यात कोणतीही अडचण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांतर्गत समीकरणे, निष्ठा आणि भविष्यातील राजकीय रणनीती या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाणार आहे. याचदरम्यान, शिंदे गटात भाकरी फिरणार, असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत असून, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक आमदारांनी आपल्या भागातील कामे होत नसल्याची तक्रार केली असून, मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धाराशिव आणि सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीचे स्वरही उघडपणे समोर आले होते. अंतर्गत बदलांची सुरुवात या पार्श्वभूमीवर, येत्या काही दिवसांत शिंदे कोणत्या मंत्र्यांना डच्चू देतात आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषद निवडणूक केवळ सदस्य निवडण्यापुरती मर्यादित न राहता, शिंदे गटातील अंतर्गत बदलांची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे या निवडणुकीत घेतले जाणारे निर्णय आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Source link
विधानपरिषद रणधुमाळीत एकनाथ शिंदेंचा पहिला चेहरा जवळपास निश्चित:दुसऱ्या जागेवर धक्का रणनीती? अकार्यक्षम मंत्र्यांवर गंडांतर