Headlines

विधान परिषदेत महायुतीचा डंका!:महाविकास आघाडीचा सुपडा साफ; कुठे बंडखोरी, कुठे 'क्रॉस व्होटिंग', वाचा सविस्तर




विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. ही निवडणूक महायुतीने प्रचंड मतांनी विजयी केली आहे. तसेच महाविकास आघाडीचा अतिशय दारुण पराभव याही निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. असे असले तरी अनेक मतदारसंघातील विजय तसेच पराभव चर्चेचा विषय ठरत आहे. कुठे क्रॉस व्होटिंग झाली, तर कुठे अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे. जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघात काय घडामोडी घडल्या. 1) नाशिकः क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघात नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला, तर भाजपमधून बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघातामुळे या ठिकाणी दराडेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी एकूण 618 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 13 मते अवैध ठरली, तर 605 मते वैध ठरली. विजयासाठी 303 मतांचा कोटा होता. मतमोजणीत गोकुळ गितेंना तब्बल 357 मते मिळाली, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीतले उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही. 2) धाराशिव: लातूर मतदारसंघात ओमराजेंनी मते फिरवली धाराशिव-लातूर-बीड विधा परिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडीची मते भाजपच्या बसवराज पाटील यांच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीची येथे चक्क दीडशे मते फुटल्याची शक्यताय. या ठिकाणी बसवराज पाटील यांना 845 मते मिळाली. तर काँग्रेसच्या महेश देशमुख यांना फक्त 124 मतांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी 14 मतपत्रिका कोऱ्या निघाल्या, तर 14 मते बाद झाली आहेत. ओमराजेंच्या खेळीमुळे या ठिकाणी काँग्रेसच्या हाती भोपळा आल्याचे दिसते. 3) सांगलीः महायुतीचा उमेदवार विजयी, पण मते फुटली सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ) यांचा तब्बल 301 मतांनी पराभव केला. हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासाठीही मोठा धक्का आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीची सुमारे 100 मते फुटली. सांगली आणि साताऱ्यात भाजप व शिंदे गटातील स्थानिक नेत्यांमधले मतभेद जगजाहीर होते. वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही परिणाम झाला नसल्याचे दिसते. 4) छत्रपती संभाजीनगर: भाजप उमेदवार विजयी, ओबीसी सोशल इंजिनिअरिंग प्रयोग यशस्वी अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून, भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी 455 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण 637 पैकी 630 मतदारांनी बजावलेल्या या मतदानात 5 मते बाद ठरली, तर विजयासाठी आवश्यक असलेला 313 मतांचा कोटा शिरसाठ यांनी सहज पूर्ण केला. ज्यामध्ये त्यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 135 आणि अपक्ष इसाक संदूक खान यांना केवळ 35 मतांवर समाधान मानावे लागले. फुलंब्री येथील माळी समाजाचे नेते असलेले सुहास शिरसाठ विजयी झाल्याने या निवडणुकीकडे महायुतीचा यशस्वी ‘ओबीसी सोशल इंजिनिअरिंग’ प्रयोग म्हणून पाहिले जात आहे. 5) नांदेड: भाजपला यश, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला श्रेय नांदेड विधान परिषद मतदारसंघातून भाजपला प्रथमच यश मिळवून देत अमरनाथ अनंतराव राजूरकर विजयाची हॅट्रिक केली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांचा अडीचशे पेक्षा अधिक मतांनी त्यांनी पराभव केला आहे. राजूरकर यांना 339 मते मिळाली, तर आष्टीकर यांना 84 मते मिळाली आणि वंचितचे प्रशांत इंगोले यांना अवघे पाच मते मिळाली आहेत. इथल्या मतदानात तब्बल 23 मते बाद ठरवण्यात आली. या विजायमागे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना श्रेय दिले जात आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात त्यांनी भाजपला प्रथमच विजय मिळवून दिला आहे. 6) सोलापूर: महायुतीचा विजय, पालकमंत्र्यांचे सूक्ष्म नियोजन अन् विरोधकांचीही साथ सोलापूरमधून भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मते मिळाली असून महायुती विजयी झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्ह्यात 11 आमदार विधानसभेचे आहेत. या विजयाने जिल्ह्यातील 12 वा आमदाराचा मान राऊत यांना मिळाला आहे. पालकमंत्री गोरे यांनी याही निवडणुकीत गाफील न राहता निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले होते. स्थानिक आघाडी, नाराजी निधी वाटपा संदर्भातील तक्रारी या सर्वांची दखल घेत तातडीने सोडविण्याचे वचन दिले होते. तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील बहुमताच्या जोरावर स्वतःची 307 मते निश्चित असल्याने या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच विजयाचा ठाम दावा केला होता. या भक्कम आकडेवारीला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या साथीची जोड मिळालीच. पण त्यासोबतच विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गट करमाळा, माढा व माळशिरस येथील आमदारांनी, सांगोल्याच्या शेकाप आमदाराने आणि जिल्ह्यातील इतर स्थानिक आघाड्यांनीही भाजप उमेदवाराला खुला पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे या निवडणुकीत पूर्णपणे जड झाले. 7) नागपूर: काँग्रेसची मते फुटली, डॉ. राजीव पोतदार 682 मतांनी विजयी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ पोटनिवडणुकीत महायुतीचे (भाजप) उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी 682 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना त्यांच्या पक्षाचे 169 मतदार असतानाही केवळ 130 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजपच्या या मोठ्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली मोठी फूट आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची यशस्वी राजकीय रणनीती. ज्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या ‘बुटीबोरी विकास परिवर्तन’ पॅनलच्या नगरसेवकांची भेट घेऊन त्यांची सर्व मते भाजपच्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. 8) भंडारा: महायुतीचा विजय, पण ‘क्रॉस व्होटिंग’चीच चर्चा भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी 302 मते मिळवून विजय संपादन केला असला तरी, या निकालात महायुतीच्या विजयापेक्षा झालेल्या ‘क्रॉस व्होटिंग’चीच सर्वाधिक चर्चा आहे. महायुतीचे भक्कम संख्याबळ, संघटनात्मक ताकद आणि भाजपने बजावलेला सक्त पक्षादेश (व्हीप) यांच्या बळावर ब्राह्मणकर यांचा विजय निश्चित झाला. मात्र काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांनी अनपेक्षितपणे 154 मते मिळवल्याने महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता उघड झाली आहे. महायुतीमधील तब्बल 35 मतदारांनी अंतर्गत नाराजीतून पक्षादेश झुगारून ‘क्रॉस व्होटिंग’ करत आपल्याच पक्ष नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते नाना पटोले, डॉ. प्रशांत पडोळे आणि इतर स्थानिक नेत्यांनी कोणताही गाजावाजा न करता मतदारांशी साधलेला प्रभावी थेट संपर्क आणि योग्य नियोजनामुळेच महायुतीची मते फोडण्यात यश आल्याचा दावा करत काँग्रेसने या निकालाला आपला नैतिक विजय मानले आहे. 9) अमरावती: काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळाचा भाजपला फायदा विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी पहिल्याच फेरीत 390 (92.63 टक्के) मते मिळवून दणदणीत विजय नोंदवत ‘हॅटट्रिक’ साधली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या नीलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळवता आले नाही. प्रवीण पोटे यांच्या या एकतर्फी आणि विक्रमी विजयाचे प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसमधील गोंधळ. काँग्रेसने स्थानिक नेत्याला डावलून बाहेरचा उमेदवार दिल्याने उफाळून आलेली नाराजी, ऐन प्रचारात उमेदवाराचे आजारपण आणि उमेदवार भाजपला ‘मॅनेज’ झाल्याच्या संशयातून स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार यामुळे पोटे यांचा विजयाचा मार्ग पूर्णपणे निर्विवाद आणि सोपा झाला. विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल 1) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
2) धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
3) नांदेड- अमर राजूरकर, भाजप
4) सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
5) नागपूर- राजीव पोतदार, भाजप
6) भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
7) अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
8) जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
9) सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
10) परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
11) नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार सहा उमेदवार बिनविरोध 12) ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
13) यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
14) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
15) पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
16) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
17) अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *