![]()
राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार असून, विधानसभेतील पक्षीय संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेने (ठाकरे गट) धरला आहे. मात्र, काँग्रेसने यावर सावध प्रतिक्रिया दिली असून, “उद्धवजींच्या उमेदवारीचे स्वागत आहे, पण आगामी राज्यसभेच्या जागेचे काय?” असा प्रश्न उपस्थित करत मविआतील मित्रपक्षांची कोंडी केली आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, १० पैकी ९ जागांवर महायुतीचे वर्चस्व स्पष्ट आहे. यात भाजपला ६, शिंदे गटाला २ आणि अजित पवार गटाला १ जागा मिळणे निश्चित मानले जात आहे. महाविकास आघाडीकडे केवळ एका उमेदवाराला निवडून आणण्याइतपत मते आहेत. याच एकमेव जागेसाठी आता मविआमध्ये खलबते सुरू झाली आहेत. विजय वडेट्टीवार यांची सावध भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना मोठे विधान केले. “उद्धव ठाकरे स्वतः लढणार असतील तर आमचा पाठिंबा असेलच, पण महाविकास आघाडी एकसंध ठेवण्यासाठी केवळ एका निवडणुकीचा विचार करून चालणार नाही. आगामी राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार असेल, याबाबत आताच स्पष्टता हवी. प्रत्येक वेळी काँग्रेसनेच त्याग करावा, असे अपेक्षित नाही,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी काँग्रेसची नाराजी बोलून दाखवली. ‘मातोश्री’वर खलबते आणि काँग्रेसची व्यथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “उद्धव ठाकरे हे आघाडीचा चेहरा आहेत, ते सभागृहात असणे आम्हालाही आनंददायीच आहे. मात्र, राज्यसभेच्या वेळी आम्हाला माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसून समन्वयाने अंतिम निर्णय घेतील.” काँग्रेसला दुसऱ्यांदा निराशेची भीती? काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा मिळू शकली नव्हती. आता विधान परिषदेची जागाही ठाकरे गटाला दिल्यास काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा ‘बॅकफूट’वर जावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी आधीच उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे गणित जुळले असले, तरी काँग्रेसने मात्र आता ‘देवाण-घेवाण’ तत्त्वावरच पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. मविआत मोठी खलबते होण्याची चिन्हे मविआतील तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असला, तरी काँग्रेसने राज्यसभेसाठी धरलेला आग्रह पाहता, येत्या काही दिवसांत मविआमध्ये जागावाटपावरून मोठी खलबते होण्याची चिन्हे आहेत.
Source link
विधान परिषद निवडणूक:उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत, पण आगामी राज्यसभेबद्दल आताच निर्णय व्हावा – विजय वडेट्टीवार