Headlines

पुण्यातील होर्डिंग्ज धोरण भाजप घेणार मागे:आयुक्त-स्थायी समिती अध्यक्षांच्या वादानंतर पक्षाने भूमिका केली स्पष्ट




पुणे शहरातील होर्डिंग्ज धोरणावरून सुरू असलेल्या वादानंतर भाजपने हे धोरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गुरुवारी (दि. २३) ही माहिती दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यातील वादामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या वादादरम्यान, ‘बघून घेतो’ असा दम देण्यात आल्याची माहिती समोर आली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षस्तरावर हे धोरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले. बिडकर म्हणाले की, मागील तीन-चार दिवसांत होर्डिंग्ज धोरणाबाबत अध्यक्षांकडून कोणताही ठाम आग्रह नव्हता. भाजपच्या प्रमुख कोर टीमने चर्चा करून हे धोरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पुणेकरांच्या हिताचा विचार करून नवीन प्रस्ताव मांडावा, त्याला भाजप पाठिंबा देईल. मात्र, अलीकडील काही दिवसांत जे प्रस्ताव समोर आले, त्यासोबत भाजप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन आणि नाविन्यपूर्ण प्रस्ताव प्रशासनाने आणल्यास त्यामागे ठामपणे उभे राहू, असे सांगत बिडकर यांनी धोरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता आवश्यक असल्यावर भर दिला. शहरातील अनधिकृत केबल्सबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. अनेक केबल्स अनधिकृत असून त्याबाबत महापालिकेकडे संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. यासाठी स्पष्ट नियम, परवानगी प्रक्रिया आणि भाडे संरचना निश्चित करणे गरजेचे आहे. त्यानंतरच संबंधितांवर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. संबंधित विषयांवर समितीने योग्य तो निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्सच्या संदर्भातही बिडकर यांनी भूमिका स्पष्ट केली. शहराच्या विकासासाठी आरएमसी प्लांट्सची आवश्यकता असून, त्यासाठी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. होर्डिंग्ज संदर्भातील प्रशासनाकडून धोरण आणण्यात आल्यानंतर ते पुणेकरांच्या हिताचे असल्यावर लगेच मान्य केले जाईल, असे बिडकर म्हणाले. त्यामुळे आगामी काळात प्रशासन कोणता प्रस्ताव मांडते आणि त्यावर राजकीय स्तरावर काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *