![]()
फुलंब्री-राजूर रस्त्यावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या रिधोरा येथील प्रसिद्ध रेणुकामाता मंदिरात येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांत राज्यभरातून, विशेषतः छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतील हजारो भाविकांची आणि महिलांची मोठी गर्दी होणार आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी आणि सुरक्षेसाठी ग्रामस्थांच्या वतीने सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. माहूरगड येथील साडेतीन पीठांपैकी एक मानले जाणारे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. भोकरदन, फुलंब्री आणि बदनापूर या तीन तालुक्यांच्या संगमावर असलेल्या या गावात नवरात्रीनिमित्त दरवर्षी भव्य उत्सव साजरा केला जातो. या मंदिरातील रेणुकामाता ही नवसाला पावणारी, दुःख-कष्ट दूर करणारी आणि भाविकांना मानसिक समाधान देणारी देवी म्हणून संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. मंदिरासमोरील उंच दीपमाळ दूरवरूनच येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेते. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यान घटस्थापनेपासून नऊ दिवस देवीची सकाळ-संध्याकाळ महाआरती, धार्मिक विधी, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. या काळात महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते. नवरात्र काळात महिला या देवीला नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर चैत्र पौर्णिमेला येथे येऊन तो फेडतात. गर्दीच्या काळात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आणि शिस्तबद्ध दर्शनरांगा, स्वच्छता आणि इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सध्या मंदिर परिसरात मंडप उभारणीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. चैत्र पौर्णिमेला पंधरा दिवस मोठी यात्रा ः नवरात्रोत्सवातही विविध कार्यक्रम रिधोरा येथे चैत्र पौर्णिमेला पंधरा दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील नागरिक भांडी व घरगुती साहित्याची खरेदी करतात. मराठवाड्यात विविध प्रकारच्या सौद्यांसाठी ही यात्रा प्रसिद्ध असून वर्षभराचा घरगुती सौदा या यात्रेतून घेऊन जातात. यंदाच्या नवरात्रोत्सवासाठीही रिधोरा ग्रामस्थ व भाविक तयारीला लागले आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज असून त्यानुसार भाविकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
रिधोरा येथील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवात हजारो भाविक येणार:दर्शनरांगा, भाविकांसाठी पाणी, आरोग्यसेवेचे नियोजन