Headlines

अभियान:वडीगोद्रीत 27 कुमारिकांना एचपीव्ही लस;‎ आतापर्यंत 41 मुलींचे यशस्वी लसीकरण‎




महिलांच्या आरोग्याची सुरक्षा आणि भविष्यातील कर्करोगमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान सध्या वरदान ठरत आहे. याच अभियानांतर्गत वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत १४ वर्षे पूर्ण झालेल्या २७ कुमारिका मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविरुद्ध (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंधक एचपीव्ही लस यशस्वीरीत्या देण्यात आली. यापूर्वी झालेल्या मोहिमेतील १६ मुलींसह आतापर्यंत एकूण ४१ पात्र मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वडीगोद्री परिसरातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणारा गर्भाशयमुखाचा कर्करोग हा अत्यंत गंभीर आजार मानला जातो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गामुळे हा आजार बळावण्याचा धोका असतो. वेळेत लस घेतल्यास या विषाणूपासून प्रभावी संरक्षण मिळते. याच उद्देशासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. लसीचे उद्दिष्ट गर्भाशयमुखाचा कर्करोग मूळापासून रोखणे आहे. एचपीव्ही विषाणूविरुद्ध शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणे हा उद्देश आहे. या लसीकरणासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न झालेल्या कुमारिका मुली पात्र आहेत. त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून या जीवनरक्षक लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पालकांनी मुलींचे लसीकरण निश्चित करावे : मुलींच्या सुदृढ भविष्यासाठी आणि आरोग्य सुरक्षेसाठी पालकांनी पुढे येऊन आपल्या मुलींचे लसीकरण निश्चित करावे. आजच्या मुलींचे आरोग्यदायी भविष्य, उद्याचा कर्करोगमुक्त समाज हा मूलमंत्र डोळ्यांसमोर ठेवून वडीगोद्री आरोग्य विभागाने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील पालकांमध्येही मुलींच्या आरोग्याविषयी मोठी जनजागृती निर्माण होत आहे. भविष्यात निरोगी पिढी तयार होण्यासाठी याची मोलाची मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *