Headlines

वीज कर्मचाऱ्यांचा जीव मोलाचा:काम करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या: महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन




दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले. सोमवारी (27 जुलै) धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी, अधीक्षक अभियंता सायस दराडे आणि सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश बुरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र पवार म्हणाले, “महावितरणच्या प्रत्येक तांत्रिक कर्मचाऱ्याचा जीव अत्यंत अनमोल आहे. कामादरम्यान अपघात झाल्यास केवळ कर्मचाऱ्याचेच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे भरून न निघणारे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने कोणतेही काम करताना सुरक्षा साधनांचा वापर केलाच पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सांघिक कार्यालयाने केंद्रीय स्तरावर दर्जेदार सुरक्षा साहित्याची खरेदी करून ते सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना पुरवले आहे. या साहित्याचा योग्य वापर करून ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे.” प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश सुरक्षा साहित्य वाटपानंतर राजेंद्र पवार यांनी धुळे व नंदुरबार दोन्ही मंडलांतील मानव संसाधन (HR) विभागाची सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेताना स्पष्ट निर्देश दिले की, व्यवस्थापनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विभागाने तत्परतेने काम केले पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित दावे, पदोन्नती पॅनल्स आणि शिस्तभंग कारवाईशी संबंधित प्रकरणांचा निपटारा निश्चित वेळेत आणि वेगाने पूर्ण करावा. या आढावा बैठकीस कार्यकारी अभियंते अतुल गायधनी, युगलकिशोर प्रसाद, मनीषा कोठारी, प्रताप मचिये, भाऊसाहेब पाटील, प्रीतम काळे, जितेंद्र महाजन, व्यवस्थापक (मा.सं.) नरेश प्रसाद, राजेंद्र गोसावी यांच्यासह महावितरणचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *