Headlines

वृक्षलागवड प्रकरणाच्या चौकशीत वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद:कामे चांगली असल्याचा अहवाल देत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न




सामाजिक वनीकरण विभागाच्या कळमनुरी तालुक्यातील वृक्षलागवड प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी वसमतच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करून कामे चांगली असल्याचा अहवाल देत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रकरणात आता तक्रारदार बाजूलाच अन् अधिकारीच तक्रारीची चौकशी थांबण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयास देऊ लागले आहेत. कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षलागवड प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांना दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी भुते यांनी सामाजिक वनीकरण विभागाला पत्र देऊन आवश्‍यक कागदपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तब्बल पाच वेळा पत्र देऊनही वनीकरण विभागाने कागदपत्रे दिलेच नाही. त्यामुळे भुते यांनी या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. मात्र या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देताच वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वसमत येथील वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वसमतच्या वनीकरण विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली तसेच कामे चांगली झाली आहेत असा अहवाल दिला. तसेच तक्रारदाराचे समाधान झाल्याचेही नमूद केले. त्या अहवालावरून वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या चौकशी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पत्र पाठविले आहे. त्यात वनीकरण विभागाने कामांची चौकशी केली असून कामे चांगली झाले आहेत, तक्रारदाराचे समाधान झाले आहे. त्या संदर्भात तक्रारदारानेही त्यांचे समाधान झाल्याचे लेखी लिहून दिल्याने तक्रार निकाली काढावी असे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांची नियुक्ती असतांना वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याच कामांची चौकशी कशी केली, या शिवाय तक्रार निकाली काढावी असे नमूद करून प्रकरणावर पडदा टाकण्याचे सुचविल्याने या प्रकरणात आता वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून इतर तालुक्यातही काही कामांमधून अनियमितता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काळात इतर तालुक्यातही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *