Headlines

वेरूळ घाटात अपघात:दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक, दोन जण गंभीर जखमी




वेरूळ मार्गावरील धोकादायक मानल्या जाणाऱ्या वेरूळ घाटात रविवारी सकाळी कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्या तत्परतेमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एमएच २० जीएक्स ६३७१ क्रमांकाची होंडा मोटारसायकल खुलताबादहून वेरूळकडे जात होती त्याच वेळी एमएच १५ केयू ८४४१ क्रमांकाची किया कंपनीची कार वेरूळहून खुलताबादच्या दिशेने येत होती. वेरूळ घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर आली. दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील गंगाधर गीताराम सुरे (३०) व प्रकाश लक्ष्मण सुरे (३५) हे दोघे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिक व इतर वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक मदत देऊन उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला. घाटरस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, धोकादायक ठिकाणी ओव्हरटेकिंग टाळावे, वळणांवर हॉर्नचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *