![]()
बीड जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करत बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही न मिळाल्याने ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या (PA) हस्तक्षेपावर कडाडून टीका केली आहे. पीएच्या इशाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) निधी वाटपावरून क्षीरसागर यांनी टीका केली आहे . ते म्हणाले की, जिल्ह्याचा संपूर्ण कारभार पीए झरे आणि देशमुख यांच्या सांगण्यावरून सुरू आहे. सुनेत्रा पवारांनी पीएच्या मनानुसार कारभार करू नये, असा थेट सल्ला त्यांनी दिला. तसेच, बीड शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला असून, पूर्वी दहा दिवसांनी मिळणारे पाणी आता वीस दिवसांनी मिळत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आम्ही गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा थेट इशाराही त्यांनी दिला. बोगस बिलांकडे दुर्लक्ष अन् निधीची कोंडी क्षीरसागर यांनी डीपीडीसीमधील भ्रष्टाचारावरही बोट ठेवले. “आम्ही डीपीडीसीमध्ये निघणाऱ्या बोगस बिलांबाबत वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. अजितदादांनी जनतेला जे शब्द दिले होते, ते आता सुनेत्रा पवारांनी पाळायला हवेत. विकासाच्या कामांसाठी आम्हाला निधी दिला जात नाही, मग अशा परिस्थितीत मी नाराज का होऊ नये?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वारंवार होणारा अपमान स्थानिक आमदार असूनही प्रशासनाकडून सतत दुजाभाव केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी कंकालेश्वर मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यालाही आपल्याला निमंत्रण दिले नव्हते, आणि आता स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणालाही डावलले गेले. यातून बीडमध्ये जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे क्षीरसागर म्हणाले. अजितदादा आणि पंकजा मुंडेंच्या कारभाराची आठवण सध्याच्या परिस्थितीची तुलना आधीच्या नेत्यांशी करताना क्षीरसागर यांनी अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “पंकजाताई आणि दादांच्या काळात आम्ही एखादे सामाजिक काम घेऊन गेलो, तर ते तातडीने मार्गी लावले जायचे. मी विरोधी पक्षातला आमदार असतानाही दादांचे बॅनर लावले होते. मात्र, आता इथे कुणीही येऊन डेरा घातला तरी त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांचे नाव न घेता लगावला.
हेही वाचा.. ध्वजारोहणातील आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हेंची नाराजी!:म्हणाल्या- महापौरांना बसायला धड खुर्ची नाही, आमदारांनाही डावलले; प्रशासनावर टीकास्त्र स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमातील आसन व्यवस्थेवरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींच्या आसन व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून योग्य नियोजन झाले नसल्याचे त्यांनी म्हटले. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत बसलेल्या असताना लोकप्रतिनिधींसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने हा मुद्दा चर्चेत आला. सविस्तर वाचा
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह: मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात, एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तर सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये केले ध्वजारोहण देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सविस्तर वाचा ‘स्वातंत्र्यदिनी तरी खोटं बोलू नका’:पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिला इशारा स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील विविध मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी युवाशक्तीबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेचे स्वागत करतानाच, देशाच्या सत्तेत तरुणांना अधिक संधी देण्याची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच कोरोना काळातील विरोधकांच्या भूमिकेबाबत मोदींनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
Source link