Headlines

शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढ्यात मोर्चा:मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, शेतकऱ्यांचा थेट इशारा




राज्यात प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित ‘शक्तीपीठ महामार्गा’ला सोलापूर जिल्ह्यातून आता टोकाचा विरोध सुरू झाला आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला असून, आज माढ्यात भव्य मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. “जर बळजबरीने जमिनी संपादन करून आमच्या सुपीक बागा उध्वस्त केल्या, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही,” असा आक्रमक इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. यामुळे आषाढीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी कोंडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज माढा तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध स्थानिक संघटनांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व करणारे संजय पाटील घाटणेकर यांनी सरकारला ठणकावून सांगितले की, या भागात द्राक्ष आणि फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे हे पीक उद्ध्वस्त करून जर महामार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, तर शेतकरी शांत बसणार नाही. या संघर्षाची झळ थेट आषाढीच्या शासकीय महापूजेला बसेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. करकंबमध्ये अधिकारी हतबल; मोजणी न करताच परतले दुसरीकडे, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन दाखल झाले होते. मात्र, मोजणी सुरू होण्यापूर्वीच शेकडो शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्याला घेराव घातला. शेतकऱ्यांचा वाढता संताप आणि घोषणाबाजी पाहून प्रशासनाला नमते घ्यावे लागले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोजणीची प्रक्रिया स्थगित करून अधिकाऱ्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. महामार्ग बदलूनही विरोध कायम यापूर्वी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली भागातून प्रचंड विरोध झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महामार्गाच्या नकाशात बदल करण्याचे संकेत दिले होते. मात्र, नवीन रचनेत ज्या गावांतून हा मार्ग प्रस्तावित आहे, तिथेही विरोधाची तीव्रता कमी झालेली नाही. जमिनीच्या बदल्यात मोबदला घेण्यापेक्षा आम्हाला आमच्या जमिनीच हव्या आहेत, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता चेंडू सरकारच्या दरबारात आगामी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यापूर्वीच सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासन आणि गृह विभागाची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचा हा रोष शमवण्यासाठी सरकार महामार्गाबाबत एखादा मोठा निर्णय घेणार की पोलिस बळाचा वापर करून प्रकल्प पुढे नेणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *