Headlines

शाळांचा 100 मीटर परिसर होणार तंबाखूमुक्त:‘नशामुक्त- तंबाखूमुक्त शाळा-महाविद्यालय परिसर'' अभियान सुरू; अंमलबजावणी कडक‎




जिल्ह्यात “मिशन उडान’ अंतर्गत ‘नशामुक्त-तंबाखूमुक्त शाळा व महाविद्यालय परिसर अभियान’ राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांचे सुरक्षित भविष्य आणि एक व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व सेवनावर कायद्याने कडक बंदी घालण्यात आली आहे. कोटपा (सीओटीपीए) अधिनियम, २००३ नुसार शाळा, महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा दंडनीय गुन्हा ठरवण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर २०० रुपये दंडाची थेट तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासही कायद्याने सक्त प्रतिबंध असून, अशा प्रकारे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि व्यसनमुक्ती घडवून आणून एक सशक्त व निरोगी समाज घडवणे हा “मिशन उडान’चा मुख्य उद्देश आहे. जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी नागरिक, शिक्षक, पालक आणि दुकानदारांनी या अभियानात सहभाग नोंदवून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षित भविष्य डोळ्यासमोर ठेवून पोलिस दलाकडून “मिशन उडाण’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि व्यसनमुक्तीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या माध्यमातून सुरक्षित, सशक्त व निरोगी समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तंबाखू हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे. तोंडाचा, जिभेचा कर्करोग हा गुटखा, मावा किंवा तंबाखू चघळल्याने होते. सिगारेट किंवा बीडीच्या धुरामुळे होतो. तसेच घसा, अन्ननलिका व स्वरयंत्राचा कर्करोगही होतो. पोटाचा, मूत्राशयाचा व स्वादुपिंडाचा कर्करोग होतो. तंबाखूतील निकोटिनमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, रक्ताची गुठळी होण्याची शक्यता वाढून हृदयाचा झटका येण्याचा धोका असतो. तसेच उच्च रक्तदाबही होतो. ई-सिगारेट,इतर व्यसनांवरही निर्बंध “मिशन उडान’ अभियानांतर्गत केवळ गुटखा व तंबाखूच नव्हे, तर सिगारेट, ई-सिगारेट तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीन पदार्थांच्या वापरावरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी या व्यसनापासून जाणीवपूर्वक दूर राहावे आणि शाळा व महाविद्यालय परिसर कायम तंबाखूमुक्त व धूम्रपानमुक्त ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करत प्रयत्न करण्यात येत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *