![]()
शासनाच्या वित्तीय व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेळेची बचत साधण्यासाठी शासकीय वेतन देयके ई-बिल पद्धतीने सादर करण्याची प्रणाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या प्रणालीचा यशस्वी वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक तांत्रिक ज्ञान आत्मसात करून ई-बिल प्रणालीचा काटेकोरपणे वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शासकीय वेतन देयके ई-बिल पद्धतीने सादर करण्याबाबत अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी मंजीत गोरेगावकर, अपर कोषागार अधिकारी बी.जी. कुरे , उपकोषागार अधिकारी व्ही.जी. गोविंदवार, कळमनुरीचे उपकोषागार अधिकारी सातपुते, औंढा नागनाथचे उपकोषागार अधिकारी प्रसाद कमलेश्वर, विविध विभागांचे आहरण व संवितरण अधिकारी, लेखाधिकारी, अधीक्षक तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, राज्य शासनाने शासकीय कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यावर भर दिला असून ई-बिल प्रणाली ही त्यातील एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. पारंपरिक पद्धतीने वेतन देयके सादर करताना लागणारा वेळ, कागदपत्रांची पूर्तता आणि विविध स्तरांवरील प्रक्रियेमुळे निर्माण होणारा विलंब टाळण्यासाठी ई-बिल प्रणाली उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीमुळे वेतन देयकांची प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक व त्रुटीरहित होणार आहे. ई-बिल प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे कार्यालयीन कामकाजाचे डिजिटायझेशन होऊन कागदविरहित प्रशासनाला चालना मिळणार आहे. तसेच देयकांच्या प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, वेळेत मंजुरी मिळविणे आणि वित्तीय शिस्त राखणे शक्य होणार असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात अंकुश दवाडे, राहुल गुमे, वैभव राऊत या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ई-बिल प्रणालीमध्ये वेतन देयके तयार करणे, आवश्यक माहिती भरणे, देयकांची ऑनलाइन सादर प्रक्रिया, त्रुटींचे निराकरण तसेच प्रणालीच्या विविध तांत्रिक बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषागार अधिकारी मंजीत गोरेगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अविनाश भगत यांनी केले.
Source link
शासकीय वेतन देयके आता होणार कागदविरहित:हिंगोलीत अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी 'ई-बिल' प्रशिक्षण, वेळेची बचत-वित्तीय शिस्त लागणार- जिल्हाधिकारी