Headlines

शिरूर बायपास परिसरात भीषण अपघात; दोन जणांचा दुर्दैवी अंत




तालुक्यातील वाडेगव्हाण येथील उद्योजक, लोकनियुक्त सरपंच प्रियंका यादव यांचे पती किशोर नामदेव यादव (वय ३८) यांचा शिरूर (पुणे) बाह्यवळण रस्त्यावर चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी हॉटेल समोरील महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार प्रथमेश प्रकाश लाड (वय ३०, रा. पलूस-कुंडल, जि. सांगली) यांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर यादव हे शिरूर येथील कामे आटोपून त्यांच्या कारने वाडेगव्हाणकडे परतत होते. हॉटेल संग्रामसमोरील रस्ता दुभाजक ओलांडून नगर रस्त्यावरून पुढे जाण्याच्या तयारीत असताना दुभाजकाच्या मध्यभागी प्रथमेश लाड आपल्या दुचाकीवर रस्ता ओलांडण्यासाठी उभे होते. यादव कार दुभाजकावरून वळवत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर यादव यांच्या कारने दुचाकीला आणि नगरच्या दिशेने जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचे स्टेअरिंग यादव यांच्या छातीवर आदळून तुटल्याचे सांगण्यात येते. तसेच कारची धडक दुचाकीस्वार प्रथमेश लाड यांना बसल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची भीषणता पाहून नागरिकांनी यादव यांना कारमधून बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला कंटेनरचालक घटनास्थळावर न थांबता पसार झाल्याची माहिती आहे. काही अंतरावर कंटेनर सोडून चालकाने पळ काढल्याचे समोर आले आहे. संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्ली येथे असलेल्या खासदार नीलेश लंके यांना यादव यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच त्यांनी रात्री उशिरा वाडेगव्हाण येथे येत यादव कुटुंबाचे सांत्वन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *