![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शहरनामा’चा तिसरा हेरिटेज वॉक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयात उत्साहात पार पडला. या वॉकला इतिहासप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवकालीन दुर्मिळ शस्त्रे आणि युद्धकला पाहून नागरिक थक्क झाले. या प्रदर्शनात चिलखत, वाघनख, दांडपट्टा, कट्यार, भाले, सांग, माडू, विविध तलवारी, सुरा, करवार, खंजीर, बिचवा यांसारखी शस्त्रे तसेच पंचधातूच्या दीड ते दोन हजार किलो वजनाच्या तोफा आकर्षणाचे केंद्र ठरल्या. शिवकालीन युद्धकौशल्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अनुभव घेताना इतिहासप्रेमींना ‘शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लाग ना पारं’ या गाण्याची आठवण झाली. किलेअर्क परिसरातील रंगीन दरवाजा व हिमायत बागजवळ असलेल्या या संग्रहालयाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि दुर्मिळ पुरातत्वीय अवशेष व कलावस्तूंची सविस्तर माहिती क्युरेटर स्वप्नील मगर, संचालक श्रीप्रकाश पुरवार आणि पुरातत्वविद आशुतोष पाटील यांनी दिली. एमजीएम विद्यापीठाचा इतिहास व पुरातत्व विभाग, आख्यान फाऊंडेशन, गरवारे कम्युनिटी सेंटर, रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्ट, अॅडगाइड मीडिया प्रा. लि., भारत पर्यटन विभाग व टीम शहरनामा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवरायांची युद्धनीती दालनात धोप तलवार, मूल्हेरी तलवार, मेवाडी तलवार, तेगा तलवार, सैफ तलवार, शिरोही तलवार यांसारख्या विविध तलवारी तसेच सुरा, करवार, खंजीर, बिचवा आणि तोफा यांसारख्या युद्धात वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाहायला मिळाल्या. किल्ले दालनात स्वराज्याच्या निर्मितीपासूनच्या किल्ल्यांचे फोटो प्रदर्शित करण्यात आले होते. मराठाकालीन जनजीवन दालनात दैनंदिन जीवनातील भांडी, दशावरती तांब्या, अभिषेक पात्र, गंगाजळी, नवग्रहलोटा, लोखंडी दिवे, गुरू-शिष्य दिवा, शमादान समई, दीपमाळा, दिवटी, दीप लक्ष्मी, कपूर आरती, पंचारती, लामन दिवा यांसारख्या दिव्यांचे प्रकार आणि देव-देवतांच्या मूर्ती होत्या. येथे चारशे वर्षांपूर्वीचे कुराण आणि सारीपाट खेळही उपलब्ध होते. ‘नाण्यातून महाराष्ट्र’ या दालनात प्राचीन नाण्यांपासून ते ब्रिटिशकाळापर्यंतची नाणी, खजिनापेटी, दागिन्यांची पेटी, जड लोखंडी कुलूप, फर्मान आणि महाराजांची जन्मकुंडली पाहता आली. तिसऱ्या हॉलमध्ये तत्कालीन मराठी साम्राज्याचा आरसा दाखवणाऱ्या वस्तू जसे अडकित्ते, सुरमादानी, वजरी, पानदान, हुक्का, सुरई, पंचपाळ, मसालादाणी, आरसे आदी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, पोथींसह सवाई माधवराव पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महादजी शिंदे यांची चित्रे संग्रहालयात आहेत. संग्रहालयाचे खास आकर्षण म्हणजे सातवाहनकालीन दालन. येथे किमान दोन हजार वर्षांपूर्वीच्या मातीच्या वस्तू आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेर तालुक्यात रामलिंगअप्पा लामतुरे यांच्या शेतात सापडलेल्या टेराकोटा ज्वेलरी, देवतांच्या मूर्ती, प्राण्यांचे जबडे आदी ऐतिहासिक वस्तू त्यांनी संग्रहालयास भेट दिल्या होत्या. हेरिटेज वॉकने पुराणवस्तू संग्रहालय पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली असून असे उपक्रम सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींनी व्यक्त केली. हेरिटेज वॉकची सुरुवात कारगिल विजय दिवसाचे स्मरण करून करण्यात आली. यावेळी गेल्या हेरिटेज वॉकच्या फोटोग्राफी स्पर्धेचे पारितोषिक वितरणही झाले. दीडशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. महापालिकेच्या पर्यटन व आरोग्य विभागाच्या टीमनेही सहकार्य केले, तसेच पर्यटन विभागाचे शफीक शहबाज यांनी शुभेच्छा दिल्या. या हेरिटेज वॉकसाठी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे व रमाकांत रौतल्ले, एमजीएम विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्व विभागाचे सहाय्यक प्रा. आशुतोष पाटील, अॅडगाइड मीडियाचे ओम परदेशी, रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्टचे निवृत्ती गजभारे, भारत पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी स्नेहल पाटील व टीम शहरनामा यांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:छत्रपती संभाजीनगरमधील पुराणवस्तू संग्रहालयात शहरनामा हेरिटेज वॉक संपन्न