Headlines

शिवप्रेमींचा पाठपुरावा:छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणाचा आग्रह; तटबंदीपासून चित्रशिल्पांपर्यंत आराखडा केला तयार




लातूरच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला आता शिवकालीन वैभवाची झळाळी देण्याची शिवप्रेमींची इच्छा आहे. चौकात देखणा आश्वारूढ पुतळा, भव्य कमानी, तटबंदी, दीपस्तंभ, आकर्षक विद्युत रोषणाई आणि शिवकालीन इतिहासातील प्रेरणादायी प्रसंगांची चित्रशिल्पे साकारून हा परिसर शहराचे आकर्षण ठरावा, अशी मागणी आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांनी छत्रपतींच्या स्मृतींना साजेसे पुतळे व परिसर विकसित केले असताना लातूरचा चौकही त्याच धर्तीवर उभा राहावा, अशी शिवप्रेमींची अपेक्षा आहे. यासाठी नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आता या मागणीला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळण्याची प्रतीक्षा आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लातूरकरांच्या अस्मितेचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. मात्र, याच ऐतिहासिक पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. १९८२ मध्ये उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला आता तब्बल ४४ वर्षे झाली आहेत. पुतळ्याभोवतीचे ग्रेनाइट ही आजवर तसेच आहे. शहराचा चेहरामोहरा बदलत असताना छत्रपतींच्या पुतळा परिसराला मात्र जुन्याच स्वरूपात ठेवण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे केवळ मागणी करून शिवप्रेमी थांबलेले नाहीत. त्यांनी स्वतःच्या खर्चाने पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचा नकाशा आणि चलचित्र तयार केले. या संकल्पनेच्या माध्यमातून अनेक पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि लातूर महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात आली. निवेदने देण्यात आली. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित निर्णय झालेला नाही. सध्याचे पालकमंत्री तथा छत्रपतींच्या गादीचे वारस असलेले शिवेंद्र राजे भोसले यांचीही पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही भेट घेतली. त्यांच्यासमोरही सुशोभीकरणाचा नकाशा आणि चलचित्र सादर करण्यात आले. मात्र, त्यानंतरही या मागणीला गती मिळाली नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी वाढत आहे. पुतळा परिसराचे सुशोभीकरण म्हणजे केवळ सौंदर्यवर्धन नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि विचारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याची संधी असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. शिवकालीन वास्तुशैली, ऐतिहासिक माहिती, प्रेरणादायी प्रसंग, आकर्षक विद्युत रोषणाई आणि नियोजनबद्ध परिसर उभारल्यास हा चौक शहराचे एक प्रमुख आकर्षण ठरू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात त्यांच्या पुतळा परिसराच्या विकास होणे गरजेचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *