![]()
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील शेंडी गावठाण शिवारात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतात खड्डा खोदून गुप्तधन काढण्याच्या नावाखाली अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी राजूर पोलिसांनी मनसेच्या तालुका अध्यक्षासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 27 ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी एकनाथ दादू भांगरे यांच्या शेतात 8 ते 9 जण घुसले होते. आरोपींनी शेतात खड्डा खोदून कापूर,अगरबत्ती पेटवली आणि मंत्र म्हणत गुप्तधन काढण्याचा बनाव केला. मुख्य इसम गुप्तधन काढून देतो, पैशांची मागणी करू लागला. ग्रामस्थांनी जाब विचारला असता, टोळक्यातील एकाने आपण पोलिस असल्याचे सांगून दहशत निर्माण केली. मात्र, ग्रामस्थांनी 112 क्रमांकावर फोन करून राजूर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून खोदलेला खड्डा, जळालेला कापूर, पूजेचे साहित्य आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी ज्ञानेश्वर नामदेव लेंडे( मनसे अध्यक्ष, राजूर विभाग) यांच्यासह योगेश वानखेडे, त्र्यंबक वानखेडे, अनंता हिंगोले, गणेश घोरपडे, रुपेश वानखेडे आणि संजय खाडे यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा व भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अकोले तालुक्यातील दुर्गमभागात गुप्तधनाच्या अफवांमधून भोळ्या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आणि अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन राजूर पोलिसांनी केले आहे. अहिल्यानगरात घरफोडी करणारीमध्यप्रदेशातील टोळी जेरबंद अहिल्यानगर शहरातील शिवनेरी चौकातील मातोश्री अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या प्रकरणी मध्यप्रदेशातील मुख्य आरोपींसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील दोघांनाही पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 13 ऑक्टोबर रोजी विवेक मारोतराव साखरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत नेवासा फाटा परिसरातून मुख्य आरोपी कपिल चंपालाल चावडा (वय 23, रा. पटवारी कॉलनी, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण,मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपला साथीदार राजा चेयनसिंग पटेल (वय 23, रा. जयमलपुरा, बडवा, ता. महेश्वर, जि.खरगोण, मध्यप्रदेश) याच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी राजा पटेलयालाही ताब्यात घेऊन चोरीचे हे दागिने विकत घेणारे अनिल रामनारायण तिवारी (56, रा.खाराकुवा, संभाजीनगर) आणि भारत नानासाहेब जोशी (वय 32, रा. हरिओमनगर,संभाजीनगर) या दोघांनाही ताब्यात घेतले. बंद घराच्या शोधात फिरते टोळी मध्यप्रदेशातील घरफोड्या करणाऱ्या आरोपींची टोळी बंद घरे किंवा अपार्टमेंटमधील घरे शोधण्यासाठी शहराच्या विविध भागात विशेषतः फारशी वर्दळ नसलेल्या भागात फिरतात. बंद घर दिसताच काही वेळ थांबून नजर ठेवतात व डाव साधतात. एका ठिकाणी घरफोडी केल्यावर ते तत्काळ शहर सोडतात व दुसऱ्या शहरात आश्रय घेतात. काही ठिकाणी पाळत ठेऊन, तर काही ठिकाणी ही टोळी संधी मिळताच घरफोड्या करत असल्याचे समोर आले.
Source link
शेतामध्ये गुप्तधनासाठी जादूटोणा अन् अघोरी पूजा:मनसे तालुका अध्यक्षासह सात जणांवर गुन्हा