Headlines

आम्ही नवा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय पक्षांच्या नाकात दम आणणार:पराभवानंतर कराळे मास्तरांची घोषणा, म्हणाले- वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये




नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा राहिली ती अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची. तब्बल २४ हजारांहून अधिक मते घेत त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितेश कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांच्या विजयाचे श्रेय घेऊ नका असा टोला लगावला आहे, तर दुसरीकडे स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून आगामी निवडणुका लढवण्याची मोठी घोषणाही त्यांनी केली आहे. कराळे मास्तरांमुळे कसे फिरले विजयाचे गणित? नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत अपेक्षित होती. मात्र, राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पहिल्या फेरीत कोहळे आणि वंजारी यांच्यात अटीतटीची लढत होती. मात्र, कराळे मास्तरांनी घेतलेली तब्बल २४ हजारांची मते निर्णायक ठरली. कराळे मास्तरांच्या मतदारांनी दिलेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळेच काँग्रेसच्या वंजारींना विजयाचा टप्पा ओलांडता आला आणि भाजपला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. एका अपक्ष उमेदवाराने दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे गणित हुकवल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. ‘वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये, भाजपने दुसरी पसंती मागितलीच नाही’ या निकालावर भाष्य करताना कराळे म्हणाले, “मी आधीच सांगितले होते की, दोनपैकी कोणीही जिंकू शकते. मी मतदान मागताना लोकांना नेहमी सांगायचो की मला एक नंबर दिल्यावर दोन नंबर तुमच्या आवडीच्या व्यक्तीला द्या. लोकांमध्ये भाजपविरोधात जो रोष होता, त्यामुळे त्यांनी दुसरी पसंती वंजारींना दिली. म्हणून अभिजित वंजारींनी या विजयाचे स्वतः श्रेय घेऊ नये. दुसरीकडे, भाजपने दुसऱ्या पसंतीचे मतदान मागितलेच नाही, हे त्यांच्यासाठी घातक ठरले. जर त्यांनी ती मते मागितली असती, तर माझ्या बॅलेटवरही त्यांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाली असती आणि त्यांची सीट जिंकून आली असती. ‘जे पेराल ते उगवेल’ अशी भाजपची अवस्था झाली आहे.” नवा पक्ष काढण्याची केली मोठी घोषणा आगामी राजकीय भूमिकेबाबत विचारले असता कराळे यांनी एक मोठा बॉम्बगोळा टाकला. ते म्हणाले, “कालचा निकाल पाहिल्यानंतर आमच्यासोबत असणाऱ्या तरुणांनी मला सांगितले की आपला चाहणारा एक मोठा वर्ग आहे, आपण भविष्यात एखादा पक्ष स्थापन करायला पाहिजे. येत्या दोन-चार दिवसांत आम्ही बैठक घेणार आहोत. ज्यांना पक्षाने डावलले आहे आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत पण ते लोकांसाठी काम करतात, अशा लोकांना आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संधी देऊ. भविष्यात आम्ही या राष्ट्रीय पक्षांच्या नाकात नक्कीच दम आणू. आतापर्यंत माझी दखल घेतली गेली नसेल, पण यापुढे प्रत्येक निवडणुकीत कराळे मास्तर कोण आहे, याची दखल त्यांना घ्यावीच लागेल.” बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी या निवडणुकीत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर झाल्याचा संदर्भ देत कराळे म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात बॅलेट पेपरवर मतदान झाल्यावर कोण विजयी होतंय हे पाहणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की त्यांनी यावर लक्ष द्यावे. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकासुद्धा बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत. तिकीट देताना काम करणाऱ्या माणसाला डावलले तर जनता मतदानातून कशी जागा दाखवते, याचा हा निकाल एक नवीन अध्याय आहे. नितेश कराळे हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. —————– हेही वाचा.. विधान परिषद निकाल: सतीश चव्हाणांचा 18 वर्षांचा गड का ढासळला? मतदारांचा रोष अन् रीलस्टार साबळे, कराळे मास्तरांनी कसे फिरवले विजयाचे गणित? 5 जागांचे सविस्तर विश्लेषण
विधान परिषदेच्या पाचही जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, पुणे शिक्षक – भाजपचे कौस्तुभ गावडे, अमरावतीत शिवसेनेचे सरनाईक, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील १८,१२४ मतांनी विजयी झाले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *