![]()
“राजकारणात युद्ध कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या मार्गाने जिंकले जाते हे पाहिले जात नाही; मात्र भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांनी पैठणी आणि पैशांच्या आमिषाला बळी पडून मतदान करावे, याची मला खरोखर कीव येते. लोकशाहीत जनतेची जशी लायकी असते, तसाच प्रतिनिधी त्यांना मिळतो आणि अमरावतीमध्ये शिक्षकांना तसाच प्रतिनिधी मिळाला आहे. माझ्या पाठीशी उभे राहिलेले 7 हजार मतदार प्रामाणिक राहिले; पण बाकीच्या सर्वांनी आपली मते विकली, याचे प्रचंड वाईट वाटते,” अशा अत्यंत संतप्त, कडवट आणि वादग्रस्त शब्दांत शिवसेनेचे (शिंदे गट) बंडखोर उमेदवार तथा माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी पराभवानंतर शिक्षक मतदारांवर घणाघात केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतीत श्रीकांत देशपांडे यांना अवघ्या 7,017 मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर त्यांनी थेट शिक्षक मतदारांच्या नैतिकतेवर आणि पात्रतेवरच तोफ डागल्याने विदर्भातील शैक्षणिक व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. 7 हजार मतदार प्रामाणिक, बाकीच्यांनी मते विकली! निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर माध्यमांशी बोलताना माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी निवडणुकीतील पैशांच्या गैरवापरावर थेट बोट ठेवले. “ज्या शिक्षकांवर समाज घडवण्याची मोठी जबाबदारी असते, त्या शिक्षकांनी पैठणी साड्या आणि रोकड स्वीकारून मतदान केले, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. महायुतीच्या विजयी उमेदवाराचे मी अभिनंदन करतो; कारण त्यांनी डावपेच लढवून विजय मिळवला.” जशी लायकी तसा प्रतिनिधी “लोकशाहीत मतदारांची जशी लायकी आणि मानसिकता असते, तसाच लोकप्रतिनिधी त्यांच्या वाट्याला येतो. अमरावतीतही तेच झाले आहे. मला मिळालेली 7,017 मते ही तत्त्वनिष्ठ आणि स्वाभिमानी मतदारांची आहेत. पराभव तो पराभवच असतो, तो मी नम्रपणे स्वीकारतो; परंतु सुशिक्षित वर्गाने मते विकल्याची खंत मनात कायम राहील.” तब्बल 32 तासांची मॅरेथॉन मतमोजणी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील विजय खेचून आणण्यासाठी महायुतीला तब्बल 32 तास घाम गाळावा लागला. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला विजयाचा विहित कोटा गाठता आला नाही. त्यामुळे तब्बल 32 तास मतपत्रिकांची छाननी आणि बाद फेऱ्या सुरू होत्या. अखेर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या 24 व्या बाद फेरीअखेर आवश्यक असलेला 16,134 मतांचा कोटा पूर्ण करत शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार किरण सरनाईक यांनी 16,663 मते मिळवून शानदार विजय संपादन केला. अदिती पोहरेंचा पराभव महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार प्रा. अदिती पोहरे यांनी पहिल्या फेरीपासून सरनाईक यांना कडवी टक्कर दिली. मात्र, सरनाईक यांनी अखेरच्या बाद फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी घेत आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा राखला. विधानपरिषद 5 जागांचे राजकीय समीकरण: महाविकास आघाडी 3, महायुती 2 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निकालांचे अधिकृत चित्र स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीने 3 जागांवर मुसंडी मारली आहे, तर सत्ताधारी महायुतीला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पक्षनिहाय कामगिरीचा ताळेबंद: भाजप: 3 जागा लढवल्या, 1 जागा जिंकली (पुणे शिक्षक). शिवसेना (शिंदे गट): 2 जागा लढवल्या, 1 जागा जिंकली (अमरावती शिक्षक). काँग्रेस: 2 जागा लढवल्या, 1 जागा जिंकली (नागपूर पदवीधर). राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 2 जागा लढवल्या, 2 जागा जिंकल्या (मराठवाडा पदवीधर व पुणे पदवीधर). एकूण जागा: महाविकास आघाडी (विरोधी पक्ष): 3 जागा महायुती (सत्ताधारी पक्ष): 2 जागा अमरावतीमध्ये बंडखोरी मोडून काढत शिंदे सेनेने गड राखला असला, तरी माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी पराभवानंतर शिक्षकांच्या ‘लायकी’वर काढलेल्या उद्गारांमुळे आता शिक्षक संघटना आणि विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर तीव्र टीकेची झोड उठवली जात आहे. ——————————————————— हेही वाचा आम्ही नवा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय पक्षांच्या नाकात दम आणणार: पराभवानंतर कराळे मास्तरांची घोषणा, म्हणाले- वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा राहिली ती अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची. तब्बल २४ हजारांहून अधिक मते घेत त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितेश कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांच्या विजयाचे श्रेय घेऊ नका असा टोला लगावला आहे, तर दुसरीकडे स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून आगामी निवडणुका लढवण्याची मोठी घोषणाही त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
पैठणी अन् पैशांवर मत विकणाऱ्या शिक्षकांची कीव येते:जशी लायकी तसा प्रतिनिधी मिळाला, अमरावती शिक्षक मतदारसंघात पराभवानंतर शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे संतापले