![]()
“ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण अत्यंत गंभीर असून कायदा आपले काम करेल आणि दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हे माझे एक खासदार म्हणून ठाम मत आहे. मात्र, या दुर्दैवी हत्येच्या आडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा पद्धतशीर राजकीय डाव रचला जात आहे. ठाण्यात एकनाथ शिंदेंना निवडणुकीच्या मैदानात पराभूत करणे शक्य नसल्यानेच हा राजकीय खेळ सुरू आहे का? पोलीस दलाच्या गैरवापरावर बोलणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःच्या कार्यकाळात काय घडले याचे उत्तर द्यावे,” अशा शब्दांत शिवसेना (शिंदे गट) खासदार मिलिंद देवरा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर तीव्र हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या आणि राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे विरोधकांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले आणि पूर्णेकर कुटुंबीयांना राजकीय षडयंत्रापासून सावध राहण्याचे कळकळीचे आवाहन केले. ठाण्यात शिंदेंचा पराभव अशक्य, म्हणूनच हत्येवरून गलिच्छ राजकारण सुरू ठाण्यातील सद्य राजकीय घडामोडींवर भाष्य करताना खासदार मिलिंद देवरा म्हणाले, “प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचे कोणालाही समर्थन करता येणार नाही. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन कायद्यानुसार मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या मताशी आम्ही ठाम आहोत.” शिंदेंना बदनाम करण्याचा कट “परंतु, या संवेदनशील विषयाचा वापर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाहक बदनामी का केली जात आहे? ठाणेकरांच्या मनावर आणि ठाण्याच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची एकहाती पकड आहे. निवडणुकीत त्यांना पराभूत करणे विरोधकांना कधीच जमले नाही आणि पुढेही जमणार नाही; म्हणूनच अशा घटनांचा राजकीय भांडवल करून शिंदेंची प्रतिमा डागाळण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.” 10 मार्च 2021 रोजी वाझेंची पाठराखण कोणी केली होती? गृहखाते आणि पोलिसांच्या गैरवापरावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवरा यांनी महाविकास आघाडीच्या काळातील कारनाम्यांची आठवण करून दिली. “10 मार्च 2021 रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची उघडपणे पाठराखण केली होती आणि त्याला क्लीन चिट दिली होती, हे महाराष्ट्र विसरलेला नाही.” उद्योजकांकडून खंडणी आणि मनसुख हिरेन हत्या “देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटके ठेवणे, उद्योगपतींना धमकावून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणे आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांची झालेली हत्या यामागे सरकारमधील कोणाचा वरदहस्त होता? तत्कालीन मुख्यमंत्र्यांची या प्रकरणात कधी साधी चौकशी तरी झाली होती का?” मुंबई पोलिसांची डागाळलेली प्रतिमा “मुंबई पोलीस दल हे देशातील अत्यंत व्यावसायिक आणि सर्वोत्तम पोलीस दल मानले जाते. परंतु महाविकास आघाडीच्या काळातील अशा लाजीरवाण्या गैरकृत्यांमुळे मुंबई पोलिसांची जागतिक प्रतिमा मलिन झाली. त्याचा थेट विपरीत परिणाम महाराष्ट्रातील उद्योग, रोजगार निर्मिती आणि परकीय गुंतवणुकीवर झाला.” पूर्णेकर कुटुंबाने राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत देवरा यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना थेट आवाहन केले. “पूर्णेकर कुटुंबीयांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर मोठा असून, त्या कुटुंबाला संपूर्ण न्याय मिळणे हीच आमची प्रामाणिक भावना आहे.” राजकीय लाभासाठी वापर करू नका “ज्या विरोधकांना पूर्णेकर कुटुंबीयांबद्दल कोणताही प्रामाणिक आदर किंवा न्याय मिळवून देण्याची तळमळ नाही, जे केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी या घटनेचा वापर करत आहेत, त्यांच्या हातातील राजकीय साधन (बाहुले) पूर्णेकर कुटुंबाने कृपया बनू नये. तुमचा लढा हा न्यायासाठी असावा, कोणाच्या राजकीय अजेंड्यासाठी नव्हे,” असे आवाहन खासदार मिलिंद देवरा यांनी शेवटी केले. —————————————————————– हेही वाचा… हा सरकारचा पराभव, आता राज्याचे नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदेंकडे द्या: विधान परिषद निकालानंतर रवींद्र धंगेकरांची मोठी मागणी विधान परिषद निवडणुकीत महायुतीला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपने “शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही, अन्यथा पाचही जागा जिंकलो असतो” असा आरोप केल्यानंतर, आता शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पलटवार केला आहे. तसेच, या निकालानंतर समन्वय साधण्यासाठी राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
पोलिसांवर बोलणाऱ्यांनी वाझेची आठवण ठेवावी!:मिलिंद देवरांची ठाकरेंवर टीका, म्हणाले- शिंदेंना निवडणुकीत हरवता येत नाही, म्हणूनच पूर्णेकर केसवरून बदनामीचा डाव