![]()
बालेवाडी येथे शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या विवाहितेला घरात प्रवेश नाकारून मारहाण केल्याप्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, त्यांची पत्नी सुप्रिया पवार आणि ८ ते १० अज्ञात महिला बाऊन्सर्सविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बाणेर पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इशिका प्रतीक पवार (३०) या १४ जुलै रोजी नोकरी व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी बालेवाडी येथील सासरी गेल्या होत्या. मात्र, सासू सुप्रिया पवार यांनी त्यांना घरात प्रवेश नाकारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्या घराच्या पार्किंगमध्ये थांबल्या होत्या. फिर्यादीनुसार, रात्रीच्या सुमारास प्रथम एक महिला बाऊन्सर तेथे आली, त्यानंतर आणखी ८ ते १० महिला जमा झाल्या. इशिका पवार यांनी त्यांचा मोबाईलवर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असताना महिलांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर सर्वांनी मिळून हाताबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना घराच्या गेटबाहेर रस्त्यावर फेकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारादरम्यान सुप्रिया पवार आणि सुनील पवार उपस्थित होते. त्यांनी महिला बाऊन्सर्सना ‘तिला मारा, गेटच्या बाहेर फेकून द्या,’ असे सांगून मारहाण करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडितेने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मागील आठवड्यातही त्यांच्यावर बाणेर पोलिस ठाण्यात सुनेचा कौटुंबिक छळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. याबाबत पुढील सविस्तर तपास बाणेर पोलिस करत आहे.
Source link
शैक्षणिक कागदपत्रांसाठी आलेल्या महिलेला मारहाण:निवृत्त ACP सुनील पवारसह 8-10 महिला बाऊन्सर्सवर गुन्हा