![]()
केमिकल इंजिनिअर म्हणजे केवळ रसायनांचे उत्पादन करणारा तज्ज्ञ, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, प्रत्यक्षात औषधे, साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, प्लास्टिक तसेच सौंदर्यप्रसाधने यांसारख्या दैनंदिन वापरातील असंख्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये केमिकल इंजिनिअर्सची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे देशासह परदेशातही केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत असून विद्यार्थ्यांचा कलही या शाखेकडे वाढत असल्याची माहिती डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आकुर्डीचे प्रवेशप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी दिली. डॉ. जाधव म्हणाले की, प्रयोगशाळेत विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे औद्योगिक स्तरावर रूपांतर करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे, ऊर्जेची बचत करणे तसेच संपूर्ण उत्पादन प्रक्रिया सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवणे, ही केमिकल इंजिनिअर्सची प्रमुख जबाबदारी असते. सध्या पेट्रोलियम, रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स, औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, सिमेंट, खतनिर्मिती, रंग आणि रबर उद्योगांमध्ये केमिकल इंजिनिअर्सची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भारतात औद्योगिकीकरणाचा वेग वाढत असतानाच अमेरिका, युरोप, संयुक्त अरब अमिराती (यूएई), सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित देशांमध्येही आकर्षक वेतनावर रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. कृषी क्षेत्राच्या प्रगतीतही केमिकल इंजिनिअरिंगची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. जैवखते, कीटकनाशके तसेच कृषी उत्पादनांपासून इथेनॉल आणि जैवइंधन (बायोफ्युएल) निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास या शाखेचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात नॅनोतंत्रज्ञान, बायोमेडिकल सिस्टीम आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वाढता वापर लक्षात घेता केमिकल इंजिनिअरिंगचे महत्त्व आणखी वाढणार असल्याचे विश्वास डॉ. जाधव म्हणाले. बी.ई. किंवा बी.टेक. पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयआयटी, आयसीटी, एनआयटी तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये एम.टेक. आणि पीएच.डी. करण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच उद्योग क्षेत्रात प्रोसेस इंजिनिअर, प्रॉडक्शन इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर, सेफ्टी इंजिनिअर, पर्यावरण अभियंता तसेच ऑपरेशन आणि मेंटेनन्स इंजिनिअर अशा विविध महत्त्वाच्या पदांवर करिअर घडविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
Source link
देश-विदेशात केमिकल इंजिनिअर्सना वाढती मागणी:कृषी क्षेत्राच्या विकासातही महत्त्वाची भूमिका – डॉ. के. टी. जाधव