![]()
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, मंदिरालगतच्या फरासखाना पोलिस ठाण्याची जागा या विस्तारासाठी हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना हरकत’ दर्शवली आहे. अर्थात, ही जागा तातडीने रिकामी केली जाणार नसून, त्याऐवजी आधी पर्यायी जागेवर नवे पोलिस संकुल उभारले जाण्याची शक्यता आहे. मात्र, मंदिर ट्रस्टने फरासखाना पोलिस ठाण्याच्या जागेची मागणी केल्यानंतर हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी आक्रमक पवित्रा घेत, थेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरच इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. दररोज 50 हजारांहून अधिक भाविकांची वर्दळ असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी, सध्याचे फरासखाना पोलिस ठाणे आणि इतर आवश्यक पोलिस कार्यालये बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळील नऊ गुंठे जागेत उभारण्यात येणाऱ्या एका आधुनिक पोलिस संकुलात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या नवीन संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच फरासखाना पोलिस ठाण्याची सध्याची जागा मंदिराच्या विस्तारासाठी रिकामी केली जाईल. मात्र, मंदिराच्या या विस्तारीकरणाला हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या व्यवस्थापनाचे व्यवस्थापन पुढील 100 वर्षे करण्याची मागणी आनंद दवे यांनी केली आहे. शनिवारवाडा, सारसबाग किंवा शाळेचे मैदान या ठिकाणी पर्यायी व्यवस्था देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, मुंबईतील लालबाग गणपती एवढेच दगडूशेठ गणपतीला भाविक येत असतात. तरी देखील ट्रस्ट व्यवस्थापन का करू शकत नाही? असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार पुढे आनंद दवे म्हणाले, देशाचे पंतप्रधान अर्धा तास मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले, तरी देखील व्यवस्थापनाला योग्य तो पर्याय शोधता आला नाही. कितीही पर्याय शोधले तरी पुढील दहा वर्षात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात गर्दी होणारच. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी या संदर्भातील निवेदन देणार असल्याचे दवे यांनी सांगितले आहे. शाळेच्या मैदानासारखा पर्यायी मार्ग शोधावा दगडूशेठ मंदिर परिसरात सातत्याने उद्भवणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केवळ पुढील दहा वर्षांचा नव्हे, तर 100 वर्षांचा विचार करून मंदिरासाठी शनिवारवाडा किंवा एखाद्या शाळेच्या मैदानासारखा पर्यायी मार्ग शोधावा, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्याच्या जागेची अधिकृत मागणी केली असली तरी, ही संपूर्ण प्रक्रिया सध्या प्रशासकीय स्तरावर सुरू असल्यामुळे यावर आताच अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. आमदार हेमंत रासने यांचा प्रस्ताव काय आहे? कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी फरासखाना पोलिस ठाण्याच्या जागेवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर पुणे पोलिसांनी काही अटींसह तत्त्वतः ‘ना हरकत’ दिल्यानंतर, त्या अटी मान्य करून हा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, नवीन पोलिस संकुल उभारल्यानंतरच मंदिराच्या विस्तारासाठी ही जागा उपलब्ध होऊ शकेल. फरासखाना पोलिस ठाण्याच्या स्थलांतराबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेतला जाणार असून, शासनाचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका आमदार हेमंत रासने यांनी मांडली आहे.
Source link
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर स्थलांतरित करा:हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याची माहिती