Headlines

राहुल गांधी देशाच्या जनतेच्या मनातून उतरले:प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले- त्यांच्यातल्या बालिशपणा अजूनही गेला नाही




काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. “राहुल गांधी यांच्यात अद्यापही सुधारणा होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसून, ते वारंवार ‘पप्पू’च्याच भूमिकेत वावरताना दिसत आहेत. त्यांच्यातला बालिशपणा अजूनही गेलेला नाही,” असा सणसणीत टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. “केवळ मोदींवर टीका करून काँग्रेसचे भले होणार नाही” राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दरेकर म्हणाले की, खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने राहुल गांधी किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाला काहीही साध्य होणार नाही. “तुम्ही एखादा महत्त्वाचा विषय किंवा अजेंडा हाती घेऊन काम केले, तर कदाचित काँग्रेसला थोडीफार उभारी मिळण्यास मदत होऊ शकेल. परंतु, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली की आपले भले होईल, या भ्रमात त्यांनी राहू नये,” असा सल्लाही दरेकरांनी दिला. “परदेशी महिलेविषयी विकृत बोलल्याने प्रसिद्धी मिळत नसते” राहुल गांधींच्या वक्तव्यांचा समाचार घेताना दरेकरांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “परदेशी महिलेविषयी विकृत बोलले की आपल्याला खूप प्रसिद्धी मिळेल, असे त्यांना वाटते. पण आपला देश हा अत्यंत व्यापक भूमिका घेणारा देश आहे. अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करणे हे आपल्या संस्कृतीला छेद देणारे आहे.” संविधानिक पदाचा विसर राहुल गांधी हे आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, याकडे लक्ष वेधत दरेकर म्हणाले की, संविधानिक पदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीने असे निराधार आणि बेजबाबदारपणे बोलणे अजिबात योग्य नाही. राहुल गांधी यांना या गोष्टी अजूनही समजत नाहीत, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. “तुम्ही आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरला आहात आणि याच पद्धतीने वागत राहिल्यास देशाच्या जनतेच्या मनातूनही तुम्ही लवकरच पूर्णपणे उतराल,” असा थेट इशारा प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. या टीकेमुळे आता भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी रंगण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच: 2024च्या विधानसभा निकालाने लोकन्यायालयाचे शिक्कामोर्तब, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल असा विश्वास- फडणवीस सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालय यावर आपला निर्णय देईलच, मात्र त्यापूर्वीच 2024च्या विधानसभा निवडणुकीत ‘लोकन्यायालयाने’ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असण्यावर शिक्कामोर्तब केले आहे,” असे ठाम मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षनाव, राहुल गांधींवर टीका, चाकण एमआयडीसीचा प्रश्न आणि जातनिहाय जनगणना अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *