Headlines

Devendra Fadnavis Statement on Shiv Sena Supreme Court Verdict


सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे

.

सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे आणि न्यायालय त्यावर योग्य तो निर्णय देईल. पण त्यापूर्वीच या राज्याच्या लोकन्यायालयाने 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपला निर्णय दिला आहे. शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादा पवार यांचीच आहे, यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष असले, तरी सुप्रीम कोर्टदेखील हाच निर्णय देईल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे.”

राहुल गांधींवर टीका- असा छिचोरपणा गल्लीतले नेतेही करत नाहीत

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. “राहुल गांधी यांनी जो ‘छिचोरपणा’ केला, तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय आहे. अशा प्रकारचा छिचोरा नेता भारताने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. त्यांनी केवळ देशाच्या पंतप्रधानांचाच अपमान केला नाही, तर इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचाही अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन अपमान केला आहे. गल्लीतले नेतेदेखील अशा पद्धतीने वागत नाहीत.” राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी या कृत्याबद्दल संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

चाकण MIDC आणि शरद पवारांच्या टीकेला उत्तर

शरद पवार यांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या स्थलांतरावरून आणि महाराष्ट्रातील 36 हजार कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले, “पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते नेहमी महाराष्ट्रहिताचा विचार करतात. त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये म्हणूनच मी ‘एक्स’वर (ट्विटर) सविस्तर उत्तर दिले आहे. देशात सर्वाधिक आणि सक्रिय कंपन्या आजही महाराष्ट्रातच आहेत. ज्या कंपन्या कधी सुरूच होऊ शकल्या नाहीत, त्यांचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करत आहेत.”

चाकणसाठी नवा आराखडा

“चाकणचा विषय निश्चितपणे गंभीर आहे आणि आम्ही तो गांभीर्याने घेतला आहे. तिथे 5 ते 7 वेगवेगळ्या यंत्रणा असल्याने समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना प्रमुख (वाली) करून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून तिथल्या समस्या लवकर दूर होतील.”

जातनिहाय जनगणनेबाबत मोदी सरकारचे आभार

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जातनिहाय जनगणनेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी माहिती दिली. ते म्हणाले, “केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना घोषित केली असून, त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आता या माहितीची नोंद भरली जाईल. कोणत्याही सरकारने आजवर ही मागणी मान्य केली नव्हती, मात्र मोदी सरकारने ती मान्य केली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”

सुप्रिया सुळेंचा पलटवार- राज ठाकरेंसारखी वेगळी चूल मांडायला हवी होती

मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “शिवसेना ही कालही, आजही आणि उद्याही उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस ही कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच असेल. जर कोणाचे मत वेगळे असेल, तर त्यांनी राज ठाकरे यांच्यासारखी स्वतःची वेगळी चूल मांडायला हवी होती. स्वतःच्या हिमतीवर नवीन पक्ष निर्माण केला असता, तर सर्वांनी त्यांचे कौतुकच केले असते.”

कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटासाठी युक्तिवाद

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला द्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने सुनावणी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. त्यानंतर या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेचा कौल असल्याचे सांगत शिंदे गटाच्या दाव्याला पाठिंबा दिला.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार, याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाने त्याला आव्हान दिले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेवरील आपला दावा कायम ठेवला जात आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील जनादेशाचा दाखला देत “शिवसेना एकनाथ शिंदेंचीच” असल्याचे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते आणि पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह याबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंदचा मुद्दा तापला : पवारांच्या टीकेला CM फडणवीसांचे आकडेवारीसह प्रत्युत्तर- 76 टक्के कंपन्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या!

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतून 20 कंपन्यांचे स्थलांतर आणि राज्यात गेल्या 5 वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना ‘X’ (ट्विटर) वरूनच अत्यंत सविस्तर आणि आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.