Headlines

संजय राऊत स्वतःच काँग्रेसच्या वाटेवर!:शिंदेंच्या महिला खासदाराचा खळबळजनक दावा, 'ऑपरेशन टायगर'वरून ठाकरेंना टोला




महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असतानाच, शिवसेना (शिंदे गट) खासदार ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संजय राऊत यांना आता पक्षात कोणी विचारत नाही. त्यांना आगामी काळात राज्यसभेची उमेदवारी मिळेल की नाही, याचीही शाश्वती नाही; म्हणूनच ते स्वतः काँग्रेसच्या वाटेवर आहेत,” असा खळबळजनक दावा खासदार वाघमारे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. संजय राऊत शिवसेना सोडणार आणि काँग्रेसमध्ये जाणार, यावर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसणार नाही, अशी स्थिती असली तरी ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या बदललेल्या भूमिकेवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या, “आमचा पक्ष हा मूळ हिंदुत्वाचा पक्ष आहे. मात्र, संजय राऊतांच्या पक्षाने (ठाकरे गट) कधीच हिंदुत्व सोडले असून त्यांनी काँग्रेससोबत सलगी केली आहे. त्यामुळे राऊत काँग्रेसमध्ये जाणे फारसे आश्चर्यकारक नाही.” ‘ऑपरेशन टायगर’च्या भीतीपोटी उद्या ‘मातोश्री’वर बैठक! ठाकरे गटाचे खासदार फुटणार आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’वर घाईघाईने खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा खरपूस समाचार घेताना ज्योती वाघमारे म्हणाल्या, “ऑपरेशन टायगरबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. खासदार फुटण्याच्या भीतीपोटीच ‘मातोश्री’वर ही बैठक होत आहे. मध्यंतरी ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, हे विसरून चालणार नाही.” धाराशिवच्या बैठकीला ओमराजे गैरहजर; वाघमारेंचा गंभीर इशारा दुसरीकडे, धाराशिव येथे नुकत्याच झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर भाष्य करताना ज्योती वाघमारे म्हणाल्या, “ओमराजे बैठकीला का आले नाहीत, याचे उत्तर तेच देऊ शकतील. मात्र, पक्षाच्या इतक्या महत्त्वाच्या बैठकीला विद्यमान खासदार उपस्थित राहत नसेल, तर ही बाब ठाकरे गटासाठी नक्कीच गंभीर आहे.” ‘प्रणित मोरे’ वादावर अधिवेशनात प्रस्ताव आणणार सध्या राज्यात गाजत असलेल्या ‘प्रणित मोरे’ शो आणि त्यातील आक्षेपार्ह वक्तव्यांवरही खासदार ज्योती वाघमारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हे सर्व प्रकार वैचारिक मर्यादा ओलांडणारे आहेत. घाणेरडी, गलिच्छ वक्तव्ये करायची, आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह बोलायचे आणि नंतर माफी मागायची, अशी एक नवीच पद्धत काही जणांनी सुरू केली आहे. अशा शोचा आम्ही तीव्र निषेध करतो. यात महिलांचाही समावेश आहे, ही खेदाची बाब आहे. या संवेदनशील विषयावर मी आगामी संसदीय अधिवेशनात विशेष प्रस्ताव आणणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *