![]()
“मनोज जरांगे ही कुणाची जहागीरदारी नाही. देशात संविधान लागू झाल्यापासून कुणीही पाटील किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. मनोज जरांगेंनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ’52 कुळ्या’ असा उल्लेख करून अत्यंत नीच भाषेत अपमान केला आहे. हा केवळ त्यांचा अपमान नसून राज्यातील तमाम ओबीसी, तेली आणि वंचित घटकांचा अपमान आहे. संविधानापेक्षा जरांगे मोठा नाही, त्यामुळे हा अपमान खपवून घेतला जाणार नाही,” असा थेट इशारा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावरही सडकून टीका केली. बावनकुळेंचा अपमान उपमुख्यमंत्र्यांना चालतो का? सदावर्ते म्हणाले, “मनोज जरांगे एका लाइव्ह चॅनेलवर येऊन बावनकुळे यांना ’52 कुळ्या’ म्हणतो. हे ऐकून मंत्री उदय सामंत यांनी त्याला त्याचवेळी थांबवायला पाहिजे होते. पण ते गप्प राहिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी ‘ठाणे का रिक्षा’ म्हणालं तर त्यांना प्रचंड राग येतो, मग जरांगेने बावनकुळे आणि ओबीसी समाजाचा अपमान केलेला त्यांना कसा चालतो?” उपमुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना छुपा पाठिंबा? उपमुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप करत सदावर्ते म्हणाले, “मनोज जरांगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच ‘लाडोबा’ आहे. शिंदेंचा जो पिक्चर सुरू आहे, त्याचा ‘सेकंड हाफ’ म्हणजे जरांगे आहे का? असा प्रश्न पडतो. जरांगेच्या या भाषेवर उपमुख्यमंत्री ब्र शब्दही काढत नाहीत. उलट ते त्याला ‘मनोज जरांगे पाटील’ असा आदर देऊन बोलतात. उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही गरिबांच्या झोपडपट्ट्या तोडायच्या भानगडीत आणि अशा राजकारणात पडू नका, लोक आधीच तुम्हाला ‘शिंदे टोळी’ म्हणायला लागले आहेत.” आरक्षणाच्या नावाखाली खोटे प्रमाणपत्र वाटप मराठा आरक्षणाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे वाटली जात असल्याचा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केला. “जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेतील चार भगिनींचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने जरांगे थयथयाट करत आहेत. पण नुसते प्रमाणपत्र रद्द होत नाही, तर खोट्या पुराव्यांच्या आधारे ते मिळवले जाते. प्रताप संग्राम जामकर यांच्या कुटुंबाकडे तीन चित्रपटगृहे (थिएटर) आणि शंभर एकर जमीन असताना, 8 लाखांच्या मर्यादेतील ‘नॉन-क्रीमीलेयर’ प्रमाणपत्र त्यांना कसे मिळते? हा खऱ्या गरिबांवर आणि ओबीसींवर मोठा अन्याय आहे.” या प्रकरणांची SIT चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कॅबिनेटमध्ये जरांगेंविरोधात हक्कभंग आणा येत्या मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनोज जरांगे यांच्याविरोधात निषेधाचा ठराव मांडून त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. “या सर्व प्रकरणात गुन्हे दाखल होतील. जयश्री पाटील आणि आमचे मराठा युवा नेते दत्ता रेंगे स्वतः पोलिसांत जाऊन तक्रारी दाखल करतील. कुणालाही सोडले जाणार नाही.” संविधानात बोट घातले तर वेगाने खाली याल शेवटी सूचक इशारा देताना सदावर्ते म्हणाले, “शिंदे साहेब, तुम्ही तेव्हा अपघाताने मुख्यमंत्री झाला असाल किंवा नसाल, पण संविधानाच्या बाबतीत गडबड केली आणि संविधानात बोट घालायचा प्रयत्न केला, तर वायुगतीने खाली याल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या ओबीसी, ब्राह्मण, भटके-विमुक्त आणि दलित घटकांचा अपमान सहन करणार नाही. जशास तसे आणि कायद्याच्या भाषेत उत्तर दिले जाईल.” हेही वाचा… राऊत औरंगजेब फॅन क्लबसोबत नाश्ता करतात; देशहिताशी त्यांना देणंघेणं नाही:उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचे राजकीय भवितव्य सेट करण्यात व्यस्त- नवनाथ बन संजय राऊत हे औरंगजेब फॅन क्लबसोबत नाश्ता करतात, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळतात अन् राहुल गांधी तसेच एमआयएमच्या नेत्यांसोबत बसतात. हे सर्व चालेल; पण देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आलेल्या खासदारांवर बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
संविधानापेक्षा जरांगे मोठे नाहीत!:बावनकुळेंचा अपमान सहन करणार नाही; गुणरत्न सदावर्तेंचा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही इशारा