![]()
सखोल अभ्यासाअभावी आजही हजारो ऐतिहासिक दस्तऐवज दुर्लक्षित आहेत, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक आणि मोडी लिपी तज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी व्यक्त केले. इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज मेमाणे यांच्या ‘इतिहासातील भुतावळ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना तो चारही बाजूंनी पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज सखोल अभ्यासाची तयारी दिसत असली, तरी त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी कमी आहे. मोडी अभ्यासकांची संख्या कमी असल्याने अनेक कागदपत्रांचा अभ्यास झालेला नाही. राज मेमाणे यांचे हे पुस्तक इतिहास अभ्यासकांना नवा दृष्टिकोन देणारे ठरेल, असे डॉ. यादव म्हणाले. मल्हार पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने सदाशिव पेठेतील भारतीय विचार साधना सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी इतिहास संशोधक शिवराम कार्लेकर आणि लेखक राज मेमाणे उपस्थित होते. मेमाणे यांच्या ‘मराठ्यांचे आरमार : द धुळप एरा’ या इंग्रजी आवृत्तीचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले. इतिहास संशोधक शिवराम कार्लेकर म्हणाले की, मराठा इतिहासाच्या अभ्यासात केवळ लढाया, तह आणि करारनाम्यांपुरते मर्यादित न राहता समाजजीवन, अर्थकारण, सरकारी यंत्रणा, स्त्रियांचे स्थान आणि सामान्य माणसाची भूमिका अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यासाठी नवे इतिहास अभ्यासक घडणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये आधुनिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि साधनांचा सूक्ष्म अर्थ लावण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. लेखक राज मेमाणे यांनी त्यांच्या पुस्तकाविषयी माहिती दिली. आजच्या काळातही देवधर्माच्या, भूत-खेतांच्या नावाखाली फसवणूक होताना दिसते. पूर्वीच्या काळी समाज वैचारिकदृष्ट्या फारसा पुढारलेला नव्हता. त्यामुळे भूतावळांबाबतच्या संकल्पना, भूतांचे प्रकार, त्यावरून होणारी फसवणूक, भुतांना नियंत्रणात ठेवणारी सरकारी यंत्रणा आणि इतिहासातील त्यासंबंधीच्या नोंदी यांचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
Source link
सखोल अभ्यासाअभावी ऐतिहासिक दस्तऐवज दुर्लक्षित:‘इतिहासातील भुतावळ’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मोडी लिपी तज्ज्ञांचे मत