![]()
सत्ता, संपत्ती आणि शरीर यांचा कधीही गर्व करू नका. या गोष्टी कायमस्वरूपी नसून एक ना एक दिवस निघून जाणार आहेत. त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा, असे आवाहन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले. करकंब येथील श्री सिद्धनाथ मंदिरात संत शिरोमणी सावता महाराज, संत नामदेव महाराज आणि सद्गुरू बजरंग तात्या महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री. सुदाम महाराज पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. त्यांच्या निरूपणाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या ‘सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा’ या अभंगावर निरूपण करताना इंदुरीकर महाराज यांनी आई-वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत हे जीवन सुखकर व यशस्वी बनविणारे चार महत्त्वाचे मंत्र असल्याचे सांगितले. यांच्या विश्वासावर चालल्यास आयुष्य निश्चितच सुंदर बनते. संत हे वारकरी संप्रदायाचा प्राण आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास करकंब व पंचक्रोशीतील सुमारे १० हजार भाविक उपस्थित होते. सद्गुरू बजरंग तात्या महाराज यांच्या शिष्य परिवाराने तसेच सुदाम महाराज पिसे यांनी सप्ताहाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. . त्यांच्या निरूपणाला गायन साथ महादेव महाराज मोरे, नामदेव महाराज आघाव, बळीराम महाराज व्यवहारे, ओंकार व्यवहारे व हनुमंत जाधव यांनी, तर पखवाज साथ लक्ष्मण कवडे व संतोष कवडे यांनी केली. आयुष्यात पैसा, शरीर आणि अंगातील मस्ती कायम राहत नाही. त्यामुळे त्याचा गर्व करू नका. प्रामाणिकपणे कष्ट करा, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आळस झटकून व्यायाम व आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. मन, इच्छा, माया, दंभ, अहंकार, मोह, मद, मत्सर आणि द्वेष यांसारख्या विकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी भगवंताचे नामस्मरण हाच कलियुगातील प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांवर चांगले संस्कार करण्याचे आवाहन करताना मोबाईलचा वापर कमी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. इंदुरीकर महाराज यांच्या विनोदी शैलीतील दृष्टांत, मार्मिक उदाहरणे आणि प्रभावी निरूपणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. तरुणांनी कष्ट करा; मोबाईलचा वापर कमी करा
Source link
सत्ता, संपत्ती अन् शरीराचा गर्व करू नका, इंदुरीकर महाराजांचे आवाहन:करकंबमध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी सोहळा कार्यक्रम