![]()
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर आणि न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “नीलम गोऱ्हे यांच्या नावामध्ये ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते,” अशी खोचक टीका अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. “पक्ष आणि चिन्हासंबंधित सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आज गोरे बाईंनी ठाकरे आडनावावर अनावश्यक टिप्पणी केली. त्यांनी केलेल्या टिप्पणीने त्यांचा बुद्ध्यांक लक्षात येत आहे. त्यांच्या नावामध्ये ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते,” असे अंधारे यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवर पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका केली होती. न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असताना विविध दावे केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “खटला न्यायालयात, विशेषतः सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना प्रत्येकाने न्यायालयावर विश्वास आहे, असेच म्हटले पाहिजे,” असे गोऱ्हे म्हणाल्या. ‘हे होणार, ते होणार’ असे दावे करण्यावर गोऱ्हेंचा निशाणा न्यायालयीन सुनावणीबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवरही नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केले. न्यायालयाने यापूर्वीही अनेकदा दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकले आहेत. त्यामुळे आता काही मुद्दे पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडले जात असल्याप्रमाणे वातावरण तयार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. “न्यायदेवतेने एक बाजू ऐकलेली आहे. ती बाजू अनेक वेळा न्यायालयात मांडली गेली आहे. तरीदेखील त्यातील मुद्दे जणू काही पहिल्यांदाच सुरू आहेत, अशा पद्धतीने माध्यमांमध्ये त्याचे कव्हरेज होत आहे. याचे मला विशेष आश्चर्य वाटते,” असे गोऱ्हे म्हणाल्या. जनादेश महायुतीला मिळाला शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील जनादेशाचाही नीलम गोऱ्हे यांनी उल्लेख केला. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काही खासदार पुन्हा शिंदे गटासोबत आल्याचा उल्लेख करत न्यायालयीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे दावे समाजात विनाकारण गोंधळ निर्माण करणारे असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले. “लोकांचा विश्वास उडावा, अशा पद्धतीचे हे बोलणे सुरू आहे. पुढील सुनावणी, तारीख आणि त्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्यांना टाईमपास म्हणून असे दावे करायचे असतील तर करू देत,” अशी टीका त्यांनी केली. ‘कपिल सिब्बल यांचं नाव मोठं आहे, पण…’ ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाबाबतही नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केले. सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांच्या नावामुळे ठाकरे गटाला आत्मविश्वास वाटतो का, या प्रश्नावर त्यांनी न्यायालयातील वकिलांच्या भूमिकेवर आपले मत मांडले. “मला न्यायाधीशांमुळे आत्मविश्वास वाटतो. वकील त्यांच्या जागी मोठे असतात. त्यांची नावं मोठी असतात आणि ते त्यांचं कर्तव्य बजावत असतात. पण बाकीची जी नावं असतात, त्यांचं चांगलं-वाईटपण काळाने, अनुभवाने आणि इतिहासाने ठरवलेलं असतं,” असे गोऱ्हे म्हणाल्या. न्यायालयासमोर दबावतंत्र चालणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूंनी पुरावे आणि युक्तिवाद मांडले गेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. उबाठामधला ठ काढून ढ करावा याच संवादादरम्यान नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. “फक्त ढगाचा गडगडाट असावा, तसं उबाठामधला ‘ठ’ काढून ‘ढ’ करावा असं दिसतंय,” अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावरच सुषमा अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना ठाकरे आडनावावर वैयक्तिक टिप्पणी करण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी त्यांच्या नावावरूनच टोला लगावला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यावर दरम्यान, शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयातील विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला आहे. विशेषतः आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह ठरवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय तसेच पक्षाच्या संघटनात्मक बहुमताचा विचार न केल्याचा मुद्दा ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान मांडल्या जाणाऱ्या कायदेशीर मुद्द्यांबरोबरच महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापले आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय काय लागतो, याकडे दोन्ही शिवसेना गटांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी फुगवण्यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांचा वापर:भाजपच्या ‘तिरंगा यात्रे’वरून अंबादास दानवेंचा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘तिरंगा यात्रे’वरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी दाखवण्यासाठी आणि ‘उधारीचे दंड फुगवण्यासाठी’ चक्क इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या यादीचा पुरावाच शेअर केल्याने भाजपच्या या शक्तिप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
उबाठामधला ठ काढून ढ करावा, नीलम गोऱ्हेंची टीका:सुषमा अंधारेंचा पलटवार- त्यांचा बुद्ध्यांक लक्षात पाहता त्यांच्या नावामध्ये ‘नी’ ऐवजी ‘ची करावे