पुण्यातील बसस्थानकांवरील अस्वच्छता आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठेकेदारांनी एसटी कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना मूलभूत सुविधा न दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, रा
.
बसस्थानकांवरील अस्वच्छता आणि ठेकेदारांना ताकीद
प्रताप सरनाईक यांनी नुकतीच पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकांची पाहणी केली. यावेळी स्थानकांवर तसेच स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, ‘मंत्री येणार’ म्हणून पिण्याच्या पाण्याचे ग्लास ऐनवेळी तिथे अडकवल्याचा दिखावा केल्याचा प्रकारही त्यांच्या लक्षात आला.
यावर संताप व्यक्त करत सरनाईक म्हणाले, “बसस्थानकांवर पाणपोईची व्यवस्था करणे, ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या विश्रांतीच्या खोल्या स्वच्छ ठेवणे, त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आणि पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून देणे, ही सर्वस्वी ठेकेदाराची जबाबदारी आहे. या कामात ठेकेदारांकडून दिरंगाई होत असेल, तर मला कारवाई करावीच लागेल. थेट कारवाई केल्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मी सुधारण्यासाठी एक-दोन संधी देईन. मात्र, तिसऱ्यांदा याच चुका आढळल्यास कारवाई अटळ आहे.”

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी विशेष ‘हेल्पलाइन’
सध्या सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये विद्यार्थी रस्त्यांवरील खड्ड्यांची अवस्था आणि बसच्या अपुऱ्या फेऱ्यांबद्दल तक्रार करत आहेत. यावर बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी विशेष ‘हेल्पलाइन’ आहे.
रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी’ची मुदत संपली; १८ तारखेपासून कारवाई
राज्यातील ऑटो-रिक्षा आणि इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नसल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील प्रस्तावित सुधारणांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. “प्रवाशांशी योग्य संवाद साधता यावा, त्यांचे म्हणणे समजून घेता यावे आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व सोयीस्कर व्हावा, यासाठी चालकांना स्थानिक (मराठी) भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. चालकांना १७ तारखेपर्यंत वेळ देण्यात आला असून, १८ तारखेपासून कारवाईला सुरुवात केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
HSRP नंबर प्लेटसाठी ३१ डिसेंबर २०२६ ची मुदत
वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याच्या निर्णयाबाबतही सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती दिली. वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर नवीन वर्षात १ जानेवारीपासून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा..
5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंदचा मुद्दा तापला:पवारांच्या टीकेला CM फडणवीसांचे आकडेवारीसह प्रत्युत्तर- 76 टक्के कंपन्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या!

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतून 20 कंपन्यांचे स्थलांतर आणि राज्यात गेल्या 5 वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना ‘X’ (ट्विटर) वरूनच अत्यंत सविस्तर आणि आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा