Headlines

संघ मुख्यालयात आज ध्वजारोहण सोहळा:सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम




राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघ मुख्यालय असलेल्या महाल येथील डॉ. हेडगेवार भवन येथे आज, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यासोबतच, रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या वतीनेही स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग परिसरातील या कार्यक्रमात सकाळी ९ वाजता राष्ट्रध्वज फडकवला जाईल. प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. राजेश सोनी हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरच्या घोष विभागातर्फे घोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पथसंचलनादरम्यान राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाईल आणि ससन्मान राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण केले जाईल. हे पथसंचलन सायंकाळी ५:२० वाजता कर्नेलबाग बंद गेटपासून सुरू होईल. मॉडेल मिल चौक, संतोषी माता चौक, हनुमान मंदिर, व्यायामशाळा मार्ग, तारेकर ज्वेलर्स, व्यायामशाळा चौक, कुंभलकर कॉलेज मार्ग, आग्याराम मंदिर चौक, रमण सायन्स मार्ग, वंदे मातरम उद्यान टी पॉईंट, भारत माता चौक, छत्रीवाले गणपती मंदिरासमोरून, गुप्ता समाज भवन आणि नागेश्वर मंदिर मार्गे हे संचलन पुढे जाईल. साधारणपणे सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत हे संचलन निर्धारित मार्गावरून मार्गक्रमण करत वंदे मातरम उद्यान येथे समाप्त होईल. संचलनाचे आगमन झाल्यावर वंदे मातरम उद्यान परिसरातील हुतात्मा स्मारक आणि भारत माता प्रतिमेच्या समक्ष राष्ट्रध्वजाला सलामी देऊन ध्वजावतरण केले जाईल. त्यानंतर येथील ॲम्फीथिएटरमध्ये आकर्षक घोष वादन सादर केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *