![]()
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि वाहतूक सुविधांच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या पाहणीदरम्यान, चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि अपूर्ण काँक्रिटीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशवाहा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कामे करताना वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याचेही त्यांनी सांगितले. टप्पा क्रमांक पाचमधील कॉर्निंग कंपनीपासून पुणे-नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. या रस्त्याच्या कामात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवून काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आवश्यक तेथे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा रस्ता पूर्ण झाल्यावर औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि मालवाहतूक अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रलंबित बाबींचे निराकरण करून कामाला गती देण्यास सांगण्यात आले. तळेगाव-चाकण महामार्गावरील खराब रस्त्याचीही पाहणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. चाकण परिसरातील वाढती औद्योगिक वाहतूक लक्षात घेता, रस्त्यांची गुणवत्ता आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले. पाहणीनंतर चाकण चौक येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
Source link
चाकण औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी सीईओ, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी:प्रलंबित रस्ते, वाहतूक सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश