![]()
“त्या काळामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारी माणसे खूप साधी आणि भोळी होती. रमेशभाऊ तीन वेळा आमदार आणि सहकार क्षेत्रात चेअरमन झाले. त्यावेळी सगळेच भोळे होते. पण मी मात्र भोळा नाही. मी जर भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी मला कधीच खाऊन टाकलं असतं,” असा मिश्किल टोला शिंदे गटाचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत जे. टी. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातील जुने नेते आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर आपल्या खास शैलीत भाष्य केले. गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यामुळे कार्यक्रमात एकच हास्याची लाट पसरली होती. सहकार क्षेत्रातील प्रवासावर भाष्य जे. टी. महाजन यांच्या आठवणींना उजाळा देताना पाटील म्हणाले, “आम्ही लहान असताना जे. टी. महाजन यांना पाहायचो. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते, अगदी एखाद्या सामान्य शेतकऱ्यासारखे. आज एका शेतकरी पुत्राच्या हस्ते एका शेतकऱ्याच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.” स्वतःच्या सहकार क्षेत्रातील प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले, “सुरुवातीला मी सहकार क्षेत्रात काम करणारा नव्हतो, मात्र संजय पवार आणि चिमणराव पाटील यांच्या आग्रहामुळे मी या क्षेत्रात आलो. सहकारात काम करताना प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करून सही करावी लागते. मी स्वतःसाठी कोणताही भत्ता घेत नाही. शेतकऱ्यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो आपण जपला पाहिजे.” खासगी कारखाने जोमात, सहकारी कारखाने बंद सहकारी संस्थांच्या सद्य:स्थितीवर गुलाबराव पाटील यांनी चिंता व्यक्त केली. “सत्तेत राहण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे सत्तेची निष्ठा राखून या संस्था नीट चालवल्या पाहिजेत. केवळ कार्यक्रम करून उपयोग नाही. आज आपल्या भागातील बेलगंगा, वसाका यांसारखे अनेक सहकारी कारखाने बंद पडले आहेत; मात्र दुसरीकडे खासगी कारखाने जोरात सुरू आहेत. जनतेने आणि शेतकऱ्यांनी विश्वासाने दिलेल्या संस्था आपण नीट सांभाळल्या, तरच सरकारही मजबूत राहील,” असे परखड मत त्यांनी मांडले. तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या प्रगतीचा उल्लेख करताना पाटील यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा संदर्भ दिला. “एक तुकाराम मुंढे आले आणि इकडे दुधाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. आज तर परिस्थिती अशी आहे की पनीरही सापडत नाही, एवढी मागणी निर्माण झाली आहे,” असे सांगत त्यांनी मुंढेंच्या कार्यपद्धतीचे आणि दूध संघाच्या वाढत्या व्यवसायाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला दूध संघाचे अध्यक्ष व भाजप आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. गुलाबराव पाटलांच्या या फटकेबाजीची सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Source link
भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी खाऊन टाकलं असतं:जाहीर कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचा मिश्किल टोला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण