Headlines

तुम्ही व्यथित झालात, मलाही वाईट वाटलं:पण मराठ्यांच्या नादी लागून मोठी चूक केलीत; चंद्रशेखर बावनकुळेंना मनोज जरांगेंचा टोला




महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली होती. बावनकुळेंच्या या भावुक व्हिडीओवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही आईचे नाव घेतले, त्यामुळे तुम्हाला मी पहिल्यांदा माफ करून सोडून देतो, इथून पुढे मी तुमच्यावर व्यंग करणार नाही,” असे जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, याचवेळी त्यांनी बावनकुळेंना २८ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांसंदर्भात चूक सुधारण्याचा अल्टीमेटमही दिला आहे. ‘आईचे नाव घेतले म्हणून माफ करतो…’ पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मला पत्रकारांनी सांगितले की चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांसमोर बोलताना भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. रात्री मी त्यांचा तो व्हिडीओ पाहिला. त्यांनी त्यात त्यांच्या आईचा उल्लेख केला. तसेच, आपण मराठ्यांच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या मराठा समाजावर खूप प्रेम करतो. मराठा समाजाच्या विरोधात जर कुणी मराठा आला तरी मी त्याला सोडत नाही, मग दुसरा कुणी आला तर त्याला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही व्हिडिओत आईचे नाव घेतले आणि तुम्ही व्यथित झालात, हे पाहून मलाही वाईट वाटले. आम्ही मराठे आहोत, आम्ही एकदा-दोनदा माफ करून सोडून देतो. त्यामुळे मी तुम्हाला यावेळी माफ करतो आणि इथून पुढे तुमच्यावर कोणतेही व्यंग करणार नाही.” ‘परळीच्या टोळीच्या नादी लागल्याने रडण्याची वेळ’ बावनकुळेंना माफ करत असतानाच जरांगे पाटलांनी त्यांच्यावर राजकीय निशाणाही साधला. ते म्हणाले, “तुम्ही इतके रडकुंडीला आलात, कारण तुम्ही मराठ्यांच्या नादी लागलात. मला तुमच्याबद्दल इतके बोलण्याची गरज नव्हती, पण तुम्ही मोठी चूक केलीत. परळीच्या टोळीच्या नादी लागून आणि त्यांचे ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे केले, म्हणूनच तुमच्यावर आज ही रडकुंडीची वेळ आली आहे. त्यामुळे इथून पुढे तरी तुम्ही त्यांचे ऐकणे बंद करा.” २८ ऑगस्टचा अल्टिमेटम अन् थेट इशारा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्यावरून राज्य सरकारला आणि बावनकुळेंना इशारा दिला. “तुम्ही केलेली चूक २८ ऑगस्टच्या आत पत्र देऊन दुरुस्त करा. जी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, ती पुन्हा वैध करा आणि समाजाला द्या, आमचे काहीही म्हणणे असणार नाही. मात्र, जर ही चूक सुधारली नाही, तर पुन्हा मी तुम्हाला सोडणार नाही,” असा सक्त इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. हेही वाचा.. रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी’ सक्तीची मुदत वाढणार नाही: 18 तारखेपासून कारवाई, सरनाईकांचा इशारा; HSRP नंबरप्लेटसाठी 31 डिसेंबरची डेडलाईन पुण्यातील बसस्थानकांवरील अस्वच्छता आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठेकेदारांनी एसटी कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना मूलभूत सुविधा न दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे असून, या निर्णयाची मुदत वाढवली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *