![]()
पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने कोंढवा परिसरात आंदोलन केले. शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळ सोडून सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात नगरसेवक गफूर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा स्वाती पोकळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना प्रवासात अडचणी येत असून, अनेक अपघातही झाले आहेत. काही नागरिकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र, पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाटील यांनी पुढे आरोप केला की, नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी, न बुजविलेल्या खड्ड्यांच्या कामांसाठी पुन्हा निविदा काढून जनतेच्या पैशांचा अपव्यय केला जात आहे. महापालिकेपासून केंद्र सरकारपर्यंत भाजपची सत्ता असतानाही पुण्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, असेही ते म्हणाले. कोंढवा परिसरातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी खड्ड्यांमध्ये कमळ सोडून भाजपचा निषेध केला. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून पुणे खड्डेमुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. श्रीकांत पाटील यांनी इशारा दिला की, पुणे शहर लवकरात लवकर खड्डेमुक्त न झाल्यास, आगामी काळात संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
Source link
खड्ड्यांमध्ये कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपविरोधात आंदोलन:कोंढवा येथे खड्डेमुक्त पुण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी