![]()
चांदवड नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा सामाजीक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन पुढील पाच दिवसांत न दि
.
नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊन-वारा-पाऊस असताना देखील सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र, या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने उपजीविकेचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजा, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व इतर आवश्यक खर्च भागवणे त्यांना कठीण झाले आहे. काही महिला कर्मचाऱ्यांना गावातील स्वच्छतेसाठी स्वतःच्या पैशातून झाडू खरेदी करावे लागत आहेत. नियमित साप्ताहिक सुट्टी न देता सुट्टी घेतल्यास थेट वेतनकपात केली जाते. वेतनाची मागणी केली असता संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही आहिरे यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पाच दिवसांत सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात दिला आहे. यावेळी सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.