Headlines

समर्थ विद्यालयामध्ये गॅलरीत बसवून ‘रेखाकले’ची परीक्षा:जिल्ह्यातील 71 केंद्रांवर एलिमेंटरी व इंटरमिजिएटसाठी 47 हजार 191 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा; ढिसाळ कारभाराने संताप‎


.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेचा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) अहिल्यानगरमध्ये पहिल्याच दिवशी पुरता फज्जा उडाला. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथील समर्थ विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये उघड दुजाभाव करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना वर्गात बेंचवर बसवले, तर उर्वरित विद्यार्थ्यांना थेट इमारतीच्या तळमजल्यावरील जमिनीवर आणि बाहेरील अरुंद गॅलरीत फरशीवर मांडी घालून बसवून पेपर सोडवून घेण्यात आला. रेखाकला ग्रेड परीक्षेला सोमवारपासून सुरुवात झाली. चार दिवस ही परीक्षा चालणार आहे. पहिल्या दिवशी दोन सत्रात झालेल्या या परीक्षेत राज्यात ७ लाख ४९ हजार ७१२ विद्यार्थी बसले होते. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ७१ केंद्रांवर एलिमेंटरी व इंटरमिजिएटसाठी ४७ हजार १९१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. समर्थ विद्यालयात ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. विद्यालयात विद्यार्थ्यांना चक्क वर्गाबाहेर बसवले गेले. दहावी बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुण मिळावेत म्हणून वर्षभर सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची या व्यवस्थेमुळे ससेहोलपट झाली.

नियमानुसार,विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था गोलाकार किंवा अर्धगोलाकार असणे आणि एकमेकांना खेटून न बसणे बंधनकारक असते. मात्र, गॅलरीत मुले एकमेकांना अगदी चिकटून जमिनीवर बसली होती. बैठक व्यवस्था, वीज, पाणी आणि स्वच्छता यासाठी कला संचालनालयाकडून प्रत्येक केंद्राला अधिकृत शासकीय निधी मिळतो, असे असतानाही अवस्थेत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गैरसोयीमुळे रेखाटन बिघडल्याने गुण घसरण्याची थेट भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, दहावीत अतिरिक्त गुण ‘अ’ श्रेणीस ७, ‘ब’ श्रेणीस ५ आणि ‘क’ श्रेणीस ३ गुण दिले जातात.

चित्र काढणे सोपे जाण्यासाठी बाहेर बसवले ^ चित्रकलेच्या पेपरमध्ये चित्र काढणे सोपे जावे, यासाठी विद्यार्थ्यांना बाहेर बसवण्यात आले होते. त्यासाठी अगोदरच सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यालयाकडे बेंचेसची बिलकुलही कमतरता नाही. या पेपरमध्ये कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठलीही संधी नाही. शिवाय बाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली होती. – वसुधा जोशी, मुख्याध्यापक, समर्थ महाविद्यालय, सावेडी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *