![]()
देशातील सर्वात आधुनिक आणि १२० किलोमीटर प्रतितास वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सुरक्षेची पोलखोल करणारा प्रकार वैजापूर तालुक्यात उघड झाला आहे. डवाळा गावाजवळील एका पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या अनधिकृत हॉटेलमध्ये खुलेआम देशी दारूची विक्री होत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारात चालकाला ग्राहक बनवून अवघ्या ७० रुपयांत देशी दारूचा पेग तयार करून देण्यात आला. संपूर्ण व्यवहार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा एक प्रवासी बुधवारी चहासाठी या ठिकाणी थांबला. त्याला संशय आला. संशयाची खात्री करण्यासाठी त्याने आपल्या चालकाला ग्राहक म्हणून पुढे केले. हॉटेल चालकाने कोणतीही विचारपूस न करता देशी दारूची बाटली उघडली. थेट पाण्याच्या बाटलीत पेग तयार करून दिला. पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारी आणि हायस्पीड महामार्गालगत सुरू असलेला हा प्रकार केवळ बेकायदेशीर दारूविक्रीपुरता मर्यादित नाही. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणारा हा प्रकार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गृहराज्यमंत्री कदम यांनी दिले कारवाईचे आदेश दारु देतानाच्या व्हायरल व्हिडिओनंतर विधानभवनाबाहेर माध्यमांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना हा प्रकार दाखवून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कदम यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संबंधित पोलिसांना चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले. सबंधित हॉटेल समृद्धी महामार्गावर नाही Ã हॉटेल समृद्धी महामार्गावर नाही. महामार्गाखाली खासगी जमीन मालकाच्या जागेवर आहे. समृद्धीवर अशा प्रकारे अनधिकृत हॉटेल सुरू करता येत नाही. आमच्या पाहणीत कोणताही दारूसाठा आढळला नाही. तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – सत्यजित ताईतवाले, पोलिस निरीक्षक, वैजापूर समृद्धीवर हॉटेलच नाही; पोलिसांनी केला दावा समृद्धी महामार्गावर खासगी हॉटेलला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे व्हायरल प्रकरणातील हॉटेल समृद्धीच्या हद्दीत नाही. मार्गाखाली शेतकऱ्याच्या खासगी जागेवर असल्याचे वैजापूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पाहणीतही हाच निष्कर्ष नोंदविण्यात आल्याचा दावा आहे. हॉटेल चालकाला पोलिसांनी दिली तंबी महामार्ग आणि वैजापूर पोलिसांनी संबंधित हॉटेलची गुरुवारी दुपारी पाहणी केली. तपासणीदरम्यान कोणताही संशयास्पद दारूसाठा आढळला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. भविष्यात तक्रारी येणार नाहीत. याबाबत हॉटेल चालकाला कडक तंबी देण्यात आली.
Source link
समृद्धीवर सुरक्षेची पोलखोल:पेट्रोल पंपाशेजारी खुलेआम देशी दारू विक्री, डवाळा गावच्या एका पेट्रोल पंपाजवळील प्रकार