![]()
समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर एका स्कार्पिओ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी-वापी भागातील खान कुटुंब उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ येथून आपल्या मूळ गावी परतत होते. त्यांची स्कार्पिओ गाडी (क्रमांक GJ 20 JQ 1353) समृद्धी महामार्गावरून जात असताना अचानक गाडीचा समोरील टायर मोठ्या आवाजासह फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दुभाजकाला (डिव्हायडर) धडकून महामार्गावरच उलटले. पाच जण जखमी; कारंजात उपचार सुरू या भीषण अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी, गाडीतील प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने कारंजा येथील स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शोएब खान (वय ३५ वर्ष), खुशबू निसा शोएब खान (वय ३० वर्ष), अरमान खान (वय १२ वर्ष), जिशान खान (वय १० वर्ष), कु. येराना खान (वय ८ वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण तापी, गुजरात येथील रहिवासी असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांकडून बचावकार्य अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. महामार्गावर टायर फुटण्याच्या वाढत्या घटनांमुळे वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे आणि टायरच्या स्थितीची वेळोवेळी तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर प्रवासादरम्यान टायरमधील हवेचा दाब आणि वाहनाचा वेग यांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारचे अपघात टाळता येतील.या अपघातात कुटुंबातील लहान मुलांसह सर्वजण सुखरूप असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
Source link
समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली