Headlines

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत थेट साधणार 'Gen Z' शी संवाद:मुंबईतील NMACC मध्ये 6 ऑगस्टला भव्य युवा-नेतृत्व परिषद




सध्याच्या काळात भारतातील तरुण पिढी लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सक्रियपणे चर्चा करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे आगामी 6 ऑगस्ट रोजी मुंबईत तरुणाईशी थेट संवाद साधणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल येथे असलेल्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात’ ‘जनरेशन झी’ आणि ‘जनरेशन अल्फा’ या नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष संवाद सोहळा ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ या संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. IIMUN तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. मोहन भागवत उपस्थित राहतील आणि नव्या पिढीच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील. जगातील सर्वात मोठ्या ‘युवा-नेतृत्व’ संमेलनांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन दिवसीय भव्य परिषदेत, देशभरातील 100 हून अधिक शहरांमधील 15 ते 19 वयोगटातील तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ऋषभ शाह यांनी 2011 मध्ये स्थापन केलेली ‘आयआयएमयूएन’ (IIMUN) ही संस्था ‘भारत’ ही संकल्पना जागतिक स्तरावर रुजवणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षांपासून 15 ते 24 वयोगटातील तरुणच या संस्थेचा संपूर्ण कारभार अत्यंत कुशलतेने सांभाळत आहेत. या विचारमंचावरून घडलेले अनेक तरुण आज देशात लोकप्रतिनिधी, आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारी, तसेच यशस्वी वकील, लेखक व नामवंत उद्योगपती म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. या संस्थेच्या सल्लागार मंडळात उद्योग, न्यायव्यवस्था, मनोरंजन आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल, दीपक पारेख आणि नादिर गोदरेज यांच्यासह खासदार डॉ. शशी थरूर, माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि महान ऑलिम्पिकपटू पी. टी. उषा यांसारख्या अनेक नामवंत व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सहभाग आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *