![]()
नागपूरमध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शासकीय क्वार्टरमध्ये आत्महत्या केली आहे. ज्ञानेश्वर झोल असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, ते नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातील ‘अर्ज व तक्रार’ शाखेत कार्यरत होते. ही घटना रविवारी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पीसीएमटी क्वार्टरमधील त्यांच्या निवासस्थानी घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (आत्महत्यापूर्व पत्र) सापडलेली नाही. पोलीस ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येमागील वैयक्तिक, कौटुंबिक किंवा कामाच्या तणावासारख्या संभाव्य कारणांचा शोध घेत आहेत. यासाठी त्यांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासले जात आहेत. घटनेपूर्वी ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेण्यासाठी मानकापूर पोलीस ठाण्याकडून त्यांचे सहकारी आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. ज्ञानेश्वर झोल यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Source link
सहाय्यक पोलीस निरीक्षकाची शासकीय क्वार्टरमध्ये आत्महत्या:नागपूरमध्ये घडली घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट