![]()
सातारा नगरपालिकेतील दोन्ही राजेंच्या गटांमधील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत, आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राजेंनी आपापल्या नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली असून, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या कामकाजात यापुढे कोणताही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत नगरसेवकांमध्ये योग्य समन्वय साधण्यावर भर देण्यात आला असून, शहरातील विविध वॉर्डांसह हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन भागांतील विकासकामे कशी मार्गी लावता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, पहिल्यांदाच निवडून आलेल्या आणि प्रशासकीय कामांचा अनुभव नसलेल्या नव्या नगरसेवकांना पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना खासदार उदयनराजे यांनी दिल्या. तर या महत्त्वपूर्ण बैठकीच्या निमित्ताने खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे हे दोन्ही राजे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. शिवेंद्रराजेंकडून मैदानावर चौकार षटकार साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर दोन दिवसांपूर्वी राजकारण आणि क्रिकेटचा अनोखा थरार पाहायला मिळाला. निमित्त होते, दणक्यात सुरू झालेल्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले क्रिकेट चषकाचे. या स्पर्धेच्या वेळी स्वतः मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हातात बॅट घेत चौकार-षटकारांची जोरदार आतषबाजी केली. मात्र, मैदानात अशी फटकेबाजी करत असतानाच त्यांनी आपल्या खास राजकीय शैलीत नगरसेवकांना कानपिचक्याही दिल्या. कोण आऊट आणि कोण नॉट आऊट, हे आम्हीच ठरवतो- शिवेंद्रराजे यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, खासदार उदयनराजे आणि मी अंपायर आहोत… त्यामुळे कोण कच्चा लिंबू आहे, कोण आऊट आणि कोण नॉट आऊट, हे आम्हीच ठरवतो. त्यांच्या या मिश्किल वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. तसेच, सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांच्याही स्वतंत्र टीम तयार करून त्यांच्या क्रिकेट मॅचेस आयोजित कराव्यात, अशी मजेशीर सूचनाही त्यांनी यावेळी केली. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या समर्थकांमध्ये झाला होता वाद काही दिवसांपूर्वी सातारा नगरपालिकेच्या सभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असलेले उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांच्यावर टीका केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर दोन्ही गटांच्या नगरसेवकांच्या अनुक्रमे जलमंदिर आणि सुरुची येथे स्वतंत्र बैठका पार पडल्या. परंतु आता नगरविकास आघाडी आणि सातारा विकास आघाडी असा कोणताही गटभेद उरला नसून सर्वजण भाजपचेच नगरसेवक आहेत, अशी स्पष्ट समज दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना दिली. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन्ही राजेंची एकमेकांशी भेट झाली आणि त्याच भेटीनंतर आज साताऱ्यात सर्व नगरसेवकांची ही महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.
Source link
सातारा पालिकेत यापुढे सावळागोंधळ खपवून घेणार नाही:खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी; सभेतील वादानंतर बैठक