![]()
पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांची एकूण २ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष आणि ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार प्रामुख्याने घडले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी अनेक नागरिकांना लक्ष्य केले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाची ५२ लाख रुपयांची फसवणूक झाली, तर येरवडा भागातील एका ज्येष्ठ महिलेला ५५ लाख ४३ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याचप्रकारे, वडगाव शेरी येथील एका तरुणाची ६८ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक झाली. चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगितले. नागरिकांनी त्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले, मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दुसऱ्या एका घटनेत, लखनौ गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी लष्कर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ५० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीला ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवली आणि अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. शहानिशा न करता ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. या सर्व प्रकरणांमध्ये शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे शेअर बाजारातील फसवणुकीचा तपास करत आहेत, तर पोलीस उपनिरीक्षक शरद शेळके ‘डिजिटल अटक’ प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
सायबर चोरट्यांकडून सव्वादोन कोटींची फसवणूक:पुण्यात वेगवेगळ्या घटनेत नागरिकांना लक्ष्य