Headlines

सारोळेथडीतील वळण बनले मृत्यूचा सापळा‎:गतिरोधक, रिफ्लेक्टर व संरक्षण कठड्याची ग्रामस्थांची तातडीची मागणी




निफाड खेडलेझुंगे – सारोळे – बोकडदरे या महत्त्वाच्या मार्गाचे नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले असले, तरी सारोळेथडी गावातील एक तीव्र अन् धोकादायक वळण सध्या प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. या वळणाचा अंदाज न आल्याने गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री भरधाव कार उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अपघातांची ही मालिका पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे तातडीने गतिरोधक, रिफ्लेक्टर आणि संरक्षण कठडा उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अपघातप्रवण ठरलेल्या या वळणाच्या अगदी खालीच नागरिकांची घरे आणि दुकाने आहेत. रात्रीच्या वेळी अथवा पावसाळ्यात रस्त्यावरील तीव्र वळण वाहनचालकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यातच रस्त्यावर कोणतेही रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे नियंत्रण सुटलेले वाहन थेट खालील घरांमध्ये किंवा दुकानांमध्ये घुसून मोठा अनर्थ घडण्याची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा जीवितहानीची वाट न पाहता तात्काळ या धोकादायक वळणाची पाहणी करावी आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर पूर्ण कराव्यात, अशी मागणी गोकुळ नागरे, गणेश नागरे, सागर नाईक, अमित नागरे, जगू निरभवणे आदींनी केली आहे.या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने धोकादायक वळणावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काँक्रीटीकरणानंतर रस्त्याची वाहतूक वाढली असून, वाहनांचा वेगही अधिक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे वळणापूर्वीच वाहनचालकांना सावध करणारे फलक लावणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरची सुविधा नसल्याने धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात रस्त्यावर घसरडेपणा निर्माण होत असल्याने अपघाताची शक्यता वाढते. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना केल्यास भविष्यातील दुर्घटना टाळता येतील. एकीकडे अपघाताचा धोका वाढला असतानाच दुसरीकडे रस्त्याच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लाखो रुपये खर्चून झालेल्या या काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे सहा महिनेही उलटलेले नाहीत, तोच अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे तडे पडले आहेत. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *