![]()
अकोल्याचा सुपुत्र सार्थक ढोले याने आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. या यशाबद्दल त्याचे वडील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. कमलकिशोर ढोले यांच्याशी साधलेला त्यांच्याच शब्दात.
.
सार्थकचे आठवीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातील ‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’मध्ये झाले. तो लहानपणापासूनच चौकस बुद्धीचा आहे. पारंपरिक डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याच्या शर्यतीत न धावता, त्याला नेहमीच संशोधनाची व काहीतरी वेगळे करण्याची आवड होती. नववी आणि दहावीसाठी आम्ही त्याला राजस्थानमधील कोटा येथे पाठवले होते.
परंतु कोटा सोडण्याचा निर्णय घेत त्याने विदेशातून अंडर-ग्रॅज्युएट शिक्षण घेण्याच्या उद्देशाने ‘इंटरनॅशनल बॅकलॉरिएट’ (आयबी) बोर्डाची निवड केली. त्याची ही बुद्धिमत्ता व जिद्द पाहून जयपूरच्या ‘जयश्री पेरीवाल इंटरनॅशनल स्कूल’ने त्याला राहण्या-खाण्यासह १०० टक्के स्कॉलरशिप दिली. सध्या तो तेथेच अकरावीत शिकत आहे.
वॉर्सा येथे सार्थक यांच्या निबंधात प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटल यांच्या विचारांवर आधारित निवड, इच्छा, तर्क आणि नैतिक जबाबदारी आदी विषयांचे विश्लेषण करण्यात आले. ‘स्वातंत्र्य आणि तर्क’ हा आयपीओ २०२६ चा मुख्य विषय होता. यापूर्वी एका स्पर्धेत त्याने एआयची तत्वज्ञानाच्या अँगलने मांडणी केली होती. अनेक पालकांना वाटते की लॉकडाऊनमध्ये मुले बिघडली, परंतु सार्थकने कोविडच्या काळात ऑनलाइन शाळा सुरू असताना मोबाइलवर गेम खेळण्यात वेळ वाया घालवला नाही. त्याने इंटरनेटचा वापर करत जागतिक दर्जाचे साहित्य व तत्त्वज्ञान वाचले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या वेगवेगळ्या देशांच्या वेळेनुसार तो रात्री जागून या परीक्षा द्यायचा. या परीक्षेत अॅरिस्टॉटल व डेकार्टेस यांसारख्या महान विचारवंतांचे विचार देऊन त्यावर निबंध लिहावे लागतात. सार्थकच्या अफाट वाचनामुळेच त्याला पाश्चात्य देशांतील विद्यार्थ्यांना मागे टाकून हे पदक मिळवता आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन क्षेत्रात चमकला; भविष्यात शास्त्रज्ञ बनणार “सार्थकला तत्त्वज्ञानासोबतच भौतिकशास्त्राचीही प्रचंड आवड आहे. यापूर्वी त्याने ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ यंग सायंटिस्ट्स’मध्ये भौतिकशास्त्रातील संशोधनाचे सादरीकरण करत कांस्यपदक मिळवले होते. तसेच भौतिकशास्त्राचा वर्ल्ड कप मानल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल यंग फिजिसिस्ट टूर्नामेंट’मध्येही त्याने भाग घेतला होता. त्याने ‘आयपीओ’च्या माजी सुवर्णपदक विजेत्याशी आणि बंगळुरूच्या डॉ. मीरा बैंदूर यांच्याशी ऑनलाइन संपर्क साधून स्वतःची तयारी केली. भविष्यात त्याला पूर्णवेळ संशोधक आणि शास्त्रज्ञ बनून देशाची सेवा करायची आहे आणि एक वडील म्हणून मी त्याच्या या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.