![]()
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे, या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे खटाव-माणचे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आहेत. आपली ही तीव्र खंत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. “साहेब, मी नक्की कुठे चुकलो?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. शेखर गोरेंच्या पत्रातील मजकूर जशास तसा… शेखर गोरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, “साहेब मी नक्की कुठे चुकलो? आपल्या सांगण्यावरून गेल्या १३ वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून, तुमच्या भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आणले व माण-खटाव मधून सर्वच निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्या उमेदवारांना ताकतीने निवडून आणण्याचे काम केले. याचे साक्षीदार माझ्या मान-खटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात अनुभवले.” शेखेर गोरे यांच्या या शब्दांतून विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्याची मोठी वेदना आणि नेतृत्वाविषयीची खंत स्पष्टपणे दिसून येत आहे. भावा-भावांमधील राजकीय पेच? विशेष म्हणजे शेखर गोरे हे भाजपचे आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. विधान परिषदेसाठी शेखर गोरे यांचे नाव चर्चेत असताना ऐनवेळी धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाल्याने गोरे गटात संतापाची लाट आहे. शेखर गोरे यांची ही भावनिक पोस्ट केवळ वैयक्तिक नाराजी नसून, आगामी निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढवणारी ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नेतृत्वासमोर मोठे आव्हान शेखर गोरे यांच्या या बंडाच्या पवित्र्यामुळे भाजपच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेतृत्वासमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे. शेखर गोरे यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश येते की ही धुसफूस निवडणुकीच्या निकालावर परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे ही वाचा… छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषद:भाजपला सुटलेल्या जागेवर अब्दुल सत्तारांच्या मुलाने भरला अर्ज; शिवसेनेकडून बंडखोरी? राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तासात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटलेली असून त्यांनी आपला अधिकृत उमेदवारही घोषित केलेला असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऐनवेळी घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे आता महायुतीमध्ये शिवसेनेकडून खरोखरच बंडखोरी होणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. सविस्तर वाचा…
Source link
साहेब, मी नक्की कुठे चुकलो?:उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून विचारणा