Headlines

सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर बदललं समीकरण?:पुण्यातील बिनविरोध निवडणुकीमागील मोठं राजकारण उघड; बिनविरोध कशी?




पुणे विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर बिनविरोध निकाल लागल्यानंतर पडद्यामागील राजकीय घडामोडींवर चर्चा रंगली आहे. राज्यातील 17 रिक्त जागांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असून 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक मतदारसंघांत नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यात पुण्यातील लढतीने विशेष लक्ष वेधले. सुरुवातीला या निवडणुकीत बंडखोरीचे चित्र दिसत असताना अखेर सर्व समीकरणे बदलली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. पुण्यात विक्रम काकडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील मैदानात होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली. विशेष म्हणजे श्रीकांत पाटील यांच्या निर्णयामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले. त्यांच्या माघारीनंतर विक्रम काकडे यांचा विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. या निर्णयामागे पडद्यामागील मोठ्या राजकीय चर्चांचा प्रभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची मुंबईतील भेट. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दिलीप वळसे पाटील यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती त्यांनी या भेटीत केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर काही वेळातच श्रीकांत पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. या चर्चेत निवडणुकीत संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी माघार घेण्याचा पर्याय समोर ठेवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. शरद पवार यांनी श्रीकांत पाटील यांना परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. अंतिम निर्णय मात्र त्यांच्या हातीच सोपवण्यात आला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना होती, अशीही चर्चा आहे. मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचे सांगितले जाते. अर्ज मागे घेण्यासाठी अवघा काही वेळ शिल्लक असताना श्रीकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि पुण्यातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग खुला झाला. या घडामोडींनंतर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर थेट विश्वासघाताचा आरोप केला. पुणे मतदारसंघात काँग्रेसचे संख्याबळ अधिक असतानाही मित्रपक्षाच्या आग्रहाखातर ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील 17 जागांपैकी पुणे आणि सातारा या दोन जागांची मागणी राष्ट्रवादीने केली होती आणि त्यानुसार काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेत पाठिंबा दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील राजकीय समीकरणांवरही मोठे प्रश्नचिन्ह प्रशांत जगताप यांनी पुढे बोलताना, या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपविरोधी लढाईचा संदेश देण्याची संधी होती, मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरून शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने काँग्रेसची फसवणूक झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे म्हटले. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस स्वबळाचा मार्ग स्वीकारण्याबाबत गंभीर विचार करेल, असे संकेतही त्यांनी दिले. पुण्यातील या बिनविरोध निवडणुकीमुळे केवळ एक जागेचा निकाल लागलेला नसून महाविकास आघाडीतील अंतर्गत संबंध आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *