Headlines

सुनेत्रा पवारांकडून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी:पक्षसंघटनेतील निष्क्रियतेवर व्यक्त केली तीव्र नाराजी




उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि महापालिका गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जवळपास सहा महिन्यांनी ही बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी पक्षसंघटनेतील निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले होते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या, त्यांची अंमलबजावणी आणि संघटनात्मक कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालकमंत्री म्हणून शहरातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आपल्यापर्यंत वेळेत पोहोचत नसल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील प्रशासकीय निर्णय, प्रस्तावित विकासकामे आणि नागरिकांच्या हिताशी संबंधित धोरणांची माहिती नियमितपणे देण्याची सक्त सूचना त्यांनी गटनेत्यांना केली. शहरातील नागरी समस्या ओळखून त्यांच्या सोडवणुकीसाठी पक्षाने ठोस आणि आक्रमक भूमिका मांडावी, तसेच जनहिताच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कोणता पदाधिकारी नेमके काय काम करीत आहे, याचा यापुढे नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ पदे घेऊन निष्क्रिय राहण्याऐवजी नागरिकांमध्ये जाऊन पक्षाचा जनसंपर्क वाढविणे आवश्यक असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार पक्षाच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या नेतृत्वाबाबत आशा निर्माण झाली आहे. मात्र, अजित पवार यांच्या प्रभावी नेतृत्वानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढणे, पक्षातील विविध गटांना एकत्र ठेवणे आणि महायुतीतील समन्वय साधणे, ही मोठी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात त्यांचे नेतृत्व आणि संघटनकौशल्य यांची खरी कसोटी लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *